
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावरील २६५ मिलियन डॉलर्सच्या फसवणुकीचा खटला मागे घेण्याच्या अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DOJ) प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाचे न्यायाधीश निकोलस गराउफिस यांनी ही केस तातडीने फेटाळून लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच “तुम्हाला ही केस का बंद करायची आहे?” असा थेट सवाल करत न्याय विभागाला आपला निर्णय स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ‘द वायर’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि अदानींच्या वकिलांकडून अमेरिकन न्यायालयात सुरू असलेली ही फौजदारी केस तातडीने बंद करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अमेरिकेच्या पूर्व न्यूयॉर्क जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश निकोलस गराउफिस यांनी शुक्रवारी न्याय विभागाची केस रद्द करण्याची याचिका अस्पष्ट असल्याचे सांगत त्याला स्थगिती दिली.
न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान कठोर शब्दांत ताशेरे ओढत म्हटले की, अमेरिकन न्याय विभागाचे या प्रकरणातील निवेदन अत्यंत त्रोटक, साधारण आणि कोणत्याही भक्कम आधाराविना आहे. अशा प्रकारच्या माहितीवरून न्यायालयाला कोणताही योग्य निष्कर्ष काढण्यास किंवा अंतिम निर्णय घेण्यास मदत मिळत नाही.
न्यायालयाने आता अमेरिकन न्याय विभागाला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. केस मागे घेण्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामागचे सविस्तर आणि ठोस कारण न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. या निर्णयामुळे अदानी समूहाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






























































