मुंबईला पावसाने झोडपले; 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-rains-heavy-rainfall-lashes-city-orange-alert-till-july-5-local-trains-delayed-waterlogging-updates

मुंबईत सोमवारपासून संततधार तर कधी जोरदार कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून शहर आणि उपनगराला चांगलेच झोडपले. मुंबईतील कुर्ला, घाटकोपर, सायन, माटुंगा, सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी, मिलन सब वे, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, खार आदी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल झाले.

हवामान खात्याने मुंबईसाठी 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. बुधवारी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या कालावधीत शहर भागात 56 मिमी, पूर्व उपनगरात 107 मिमी तर पश्चिम उपनगरात 95 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, शहर भागातील परळ येथे 78 मिमी, माटुंगा 82 मिमी, वडाळा 78 मिमी, दादर 84 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे 152 मिमी, पवई 1152 मिमी, भांडुप 155 मिमी तर मुलुंड 166 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरात 139 मिमी, सांताक्रूझ 141 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबईत बुधवारी सकाळपासून पावसाची कोसळधार सुरू राहिली. त्यामुळे सांताक्रूझ, वांद्रे, खार, कुर्ला, माटुंगा, सायन, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, पवई आदी ठिकाणी सखल भागात कमी-अधिक प्रमाणात पाणी साचल्याने त्याचा रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. तसेच, मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक 15- 20 मिनिटे उशिराने सुरू होती. त्याचा रेल्वे व रस्ते वाहतूक करणाऱया प्रवाशांना फटका बसला.

खाडीत वाहून गेलेली व्यक्ती सापडली

29 जून रोजी दुपारी 12च्या सुमारास वाशी खाडीमध्ये वाहून गेलेली एक व्यक्ती आज बुधवारी मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी येथे आढळून आली. स्थानिक पोलिसांनी त्यास पाण्याबाहेर काढून राजावाडी रुग्णालय येथे नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताचे नाव मोहम्मद अली खान (33) असे आहे. याबाबतचा अधिक तपास स्थानिक पोलिसांमार्फत सुरू आहे.
तीन ठिकाणी भिंती, घरांची पडझड मुसळधार पावसात पूर्व उपनगरात 2 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात एक ठिकाणी असे 3 ठिकाणी घरे, भिंतीचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या.

वाळकेश्वरमध्ये बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईत झालेल्या जोरदार पावसाने वाळकेश्वर येथील एका इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत संतोष रामचंद्र भरसकर (51) यांचा मृत्यू झाला. वाळकेश्वर येथील बाबुलनाथ रोडवर सूर्या प्रकाश ही तळ अधिक तीन मजली म्हाडाची सेस इमारत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास तिसऱया मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट, रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या संतोष भरसकर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.