
सांताक्रूज येथील एल.एस. रहेजा आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयाने 45 टक्के गुण आवश्यक असण्याची अट टाकून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवीकरिता प्रवेश नाकारला आहे. महाविद्यालयाच्या या निर्णयावर युवासेनेने संताप व्यक्त करत विद्यापीठावर धडक दिली. प्रवेश नाकारणाऱया महाविद्यालयाला समज द्या अशी मागणी यावेळी युवासेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
महाविद्यालय प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाबाबत पालक व विद्यार्थ्यांनी त्यांना जाब विचारला असता महाविद्यालय संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला असून कॉमर्स सर्वसाधारण अभ्यासक्रमासाठी किमान गुण 45 टक्के आवश्यक असण्याची अट घालण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करणाऱया महाविद्यालयास समज देऊन इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश द्या, अशी मागणी केली आहे.
युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, किसन सावंत, स्नेहा गवळी, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि स्थानिक शाखाप्रमुख सुनील मोरे आदी यावेळी उपस्थित होते. याबाबत प्र. कुलगुरू भामरे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सत्यशोधक समिती गठीत केली आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.





























































