एडनच्या आखातात हिंदुस्थानी जहाज हायजॅक करण्याचा प्रयत्न; नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी समुद्री चाच्यांना पळवून लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नौदलाने पुन्हा एकदा समुद्रात आपली ताकद दाखवून दिली आहे. एडनच्या आखातामध्ये व्यापारी जहाजावर झालेला समुद्री चाच्यांचा हल्ला हिंदुस्थानी नौदलाने उधळून लावला. बुधवारी रात्री समुद्रा चाच्यांनी हिंदुस्थानी जहाज हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आयएनएस त्रिकंद या युद्धनौकेने तातडीने कारवाई करत ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’ या मालवाहू जहाजाची सुटका केली. नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी संपूर्ण जहाजाचा ताबा घेतला असून जहाजावरील खलाशासह सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

एमव्ही गोल्डन आर्सेनल हे मालवाहू जहाज हिंदुस्थानसाठी आवश्यक असलेला अत्यंत महत्त्वाचा माल घेऊन जात होते. या जहाजावर एक हिंदुस्थानी खलाशी देखील तैनात होता. एडनच्या आखातातून प्रवास करत असताना अचानक काही समुद्री चाच्यांनी या जहाजाचा पाठलाग सुरू केला आणि हे जहाज हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ अँटी-पायरेसी प्रोटोकॉल सक्रिय केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी जहाजावरील एका सुरक्षित खोलीत स्वतःला लॉक करून घेतले. याच वेळी त्यांनी आपत्कालीन दळणवळण यंत्रणेद्वारे मदतीसाठी संकट संदेश जारी केला.

दरम्यान, याच परिसरात गस्त घालत असलेल्या हिंदुस्थानी नौदलाच्या आयएनएस त्रिकंद या अत्याधुनिक युद्धनौकेला हा संकट संदेश मिळाला. नौदलाने क्षणाचाही विलंब न लावता युद्धनौकेची दिशा एमव्ही गोल्डन आर्सेनलच्या दिशेने वळवली. हिंदुस्थानी नौदलाची महाकाय युद्धनौका वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच चाच्यांचे धाबे दणाणले. नौदलाचा वाढता दबाव आणि कारवाईच्या भीतीने समुद्री चाच्यांनी तिथून पळ काढला.

समुद्री चाचे पळून गेल्यानंतरही हिंदुस्थानी नौदलाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे नौदलाचे घातक विशेष दल असलेल्या मार्कोस कमांडो एमव्ही गोल्डन आर्सेनलवर जहाजावर चढले. कमांडोंनी संपूर्ण जहाजाची कसून तपासणी केली. जहाजावर कुठेही स्फोटके किंवा समुद्री चाचे लपलेले नाहीत याची खात्री झाल्यानंतर हे जहाज पूर्णपणे सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेत जहाजावरील कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. तसेच जहाजाचेही कोणतेही नुकसान झालेले नाही.