
मुंबईमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. शुक्रवारी लक्षवेधीचे उत्तर देण्यासाठी सभागृहामध्ये संबंधित खात्याचा एकही मंत्री उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. मंत्रीच उपस्थित नसल्याने विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी मुंबईच्या प्रश्नाबाबत विधानसभेमध्ये चर्चा होणार होती. मात्र लक्षवेधीचे उत्तर देण्यासाठी एकही मंत्री उपस्थित नव्हता. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. विरोधी आमदारांसह सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांच्या कारभारावर सवाल उपस्थित केला.
पाऊस असून आम्ही पोहोचलो पण मंत्री नाही, असे म्हणत सभागृह तहकूब करा अशी मागणी तालिका अध्यक्षांकडे केली. त्यामुळे सुरुवातीला विधानसभेचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मंत्री उपस्थित राहू न शकल्याने पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली होर्डिंग्ज माफिया, वरुण सरदेसाई यांनी उठवला विधानसभेत आवाज




























































