
चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातही काही भागात संततधार पाऊस सुरू आहे. चांदोलीत सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली. चोवीस तासांत तब्बल 118 मि.मी. पाऊस झाला. धरणातील पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. दमदार पावसाने कृष्णा आणि वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पाणीपातळी संध्याकाळी 20 फुटांवर पोहोचली.
सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ात वाढ होत आहे. कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत 319 मि.मी. पाऊस झाला असून, धरणात 38.13 टीएमसी झाला. चांदोली धरण क्षेत्रात तब्बल 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चांदोलीत सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी होत आहे. वारणा धरणामध्ये 16.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. रात्री उशिरापर्यंतही पाऊस सुरूच आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, मिरज, कडेगाव आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला. कृष्णा, वारणा नदी दुथडी भरून वाहत आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 20 फुटांपर्यंत गेली आहे.
कृष्णा, वारणावरील बंधारे पाण्याखाली
कृष्णा-वारणेवरील बंधारे पाण्याखाली कृष्णा नदीवरील सांगली जिल्ह्यातील बहे (ता. वाळवा), नागठाणे (ता. पलूस), मिरज तालुक्यातील सांगली, खटाव ते नांद्रे, वारणा नदीवरील मांगले ते सावर्डे, समडोळी ते कोथळी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खटाव ते नांद्रे पुलावरून पाणी वाहत असल्याने सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नांद्रे ते ब्रम्हनाळ या मार्गावरीलही वाहतूक बंद आहे.



























































