सांगली जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याचे आव्हान; कुष्ठरोगमुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उरली चार वर्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रकाश कांबळे

भारत 2030 पर्यंत कुष्ठरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर जोरदार नियोजन करून काम सुरू आहे. घरोघरी कुष्ठ रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. मोफत औषधोपचारही करण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दीडशे कुष्ठ रुग्ण संख्या आहे. कुष्ठरोगमुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अवघी साडेचार वर्षे बाकी आहेत. त्यामुळे जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

कुष्ठ रुग्ण शोध मोहीम ही केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा भाग आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारकडून प्रथमच कुष्ठ रुग्ण शोध मोहीम सुरू केली गेली. यात कुष्ठरोगाने बाधित असलेल्या पण अद्याप निदान न झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना लवकर उपचार देऊन रोगाचा प्रसार थांबवणे हे उद्दिष्ट होते. आतापर्यंत कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेचे सात टप्पे झाले आहेत. यात घर-घर तपासणीद्वारे रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. जिल्हा स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कुष्ठ रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध आहेत. जिल्हा कुष्ठरोग कार्यालयात सर्व कुष्ठरोग संबंधित कार्यक्रमांचे नियंत्रण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे सल्ला, तपासणी आणि उपचार मार्गदर्शन दिले जाते. याशिवाय मानसिक व सामाजिक साहाय्य, पुनर्स्थापना यासाठी समुपदेशन केले जाते.

कुष्ठ रुग्णांची संख्या दीडशेवर

कुष्ठरोगाबद्दल अनेक समज गैरसमज असल्यामुळे हा आजार लपवण्याकडेच जास्त कल होता. मात्र कुष्ठ रुग्ण शोध मोहीम, जनजागृती यामुळे हा आजार झालेले रुग्ण सापडू लागले आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या चार वर्षे दीडशेपेक्षा अधिक दिसत आहे.

बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय

सन 2021-22 पासून जिल्ह्यात पाच वर्षांत 756 कुष्ठ रुग्ण आढळले असून, त्यापैकी 621 रुग्ण बरे झाले आहेत, तर 135 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातत्याने सुरू असलेल्या या मोहिमेमुळे सध्या जिल्ह्यात कुष्ठ रुग्ण आढळत आहेत. एका टप्प्यानंतर ही संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

स्थलांतरितांमध्ये जास्त प्रमाण

ऊसतोड मजूर, बांधकाम मजूर अशा स्थलांतरितांमध्ये कुष्ठरोगाचे जास्त प्रमाण दिसून येते. वाळवा आणि शिराळा तालुक्यात ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांमध्ये कुष्ठ रुग्णांची संख्या अधिक आहे. जत, तासगाव, पलूस तालुक्यांतही कुष्ठ रुग्ण आढळून येत आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार येथून येणारे बांधकाम मजूर, वीटभट्टी मजुरांमध्येही कुष्ठ रुग्णांची संख्या दिसून येते. ही संख्या महापालिका क्षेत्रात जास्त आढळून येते.

समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक

भारताने 2030 पर्यंत ‘झीरो लेप्रसी’ हे लक्ष्य ठेवले आहे. या अंतर्गत नवीन प्रकरणांची संख्या दहा हजार लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी करणे, दिव्यंगत्वाचा दर शून्याजवळ आणणे, सामाजिक भेदभाव पूर्णपणे नष्ट करणे, भविष्यात कुष्ठरोग शून्य करण्यासाठी लवकर निदान, मोफत उपचार, जनजागृती, संशोधन, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि समाजाचा सक्रिय सहभाग या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.