फडणवीसांच्या भाषणाचा धबधबा, तर्काची ‘लिंक’ मिसिंग; दीड तासाच्या उत्तरात विरोधकांवर आगपाखड, विधानसभेत फक्त शेर पाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत अतिवृष्टीने पडलेली झाडे, ठिकठिकाणी पाणी साठून झालेली वाहतूककोंडी, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत भाषणाचा धबधबा पाडला. महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात मुंबईची झालेली तुंबई आणि मिसिंग लिंकच्या कामात त्रुटी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी महायुती सरकारच्या चुका दाखवणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी आगपाखड केली. मुंबईची तुंबई होण्यास आणि झाडे पडण्यास चार दिवसांत पडलेल्या पावसास जबाबदार ठरवले, तर मिसिंग लिंकचे काम दर्जेदार असल्याचे सांगत तर्काची लिंकच मिसिंग झाल्यागत शेरोशायरी करत स्वतःची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटून घेत महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही, असे सांगत महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराकडे बोट दाखवणाऱ्यांना धमकावले.

विधानसभेत नियम 293 च्या माध्यमातून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील समस्या आणि विकासकामांबाबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. जवळपास दीड तास भाषण करत विकासकामांचा तुफानी पाऊस पाडला. मुंबईमध्ये तुफानी पाऊस झाला तशीच विधानसभा सभागृहात मुंबईवर तुफानी चर्चा येथे बरसताना पाहायला मिळाली, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दर पावसामध्ये मुंबईकरांना आपत्तींना सामोरे जावे लागते, यावेळी सहा दिवसांत महिन्याभराचा पाऊस झाला. चार दिवसांत 90 टक्के पाऊस झाला. पावसाळय़ात एकूण जेवढा पाऊस पडतो त्याच्या 42 टक्के पाऊस मुंबईत झाला. 50 ते 75 किलोमीटर ताशी वेगाने वारे आणि 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याने मुंबईकरांना त्रास झाल्याचे सांगत मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱयांची पाठराखण केली.

हिंमत होती म्हणून मिसिंग लिंक केला

आघाडी सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 पानी पत्र लिहून 14 कारणं देऊन, मिसिंग लिंक होऊ शकत नाही, असे सांगून ती फाईल बंद केली, मात्र आम्ही अधिकाऱयांशी आणि तज्ञांशी बोललो, त्यांनी मिसिंग लिंक उभारणे शक्य असल्याचे सांगितले. आपण हे करून दाखवलं. ही फक्त मिसिंग लिंक नाही तर इंजिनीअरिंग मार्व्हल आहे. हा भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज आणि जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून मिसिंग लिंक केला, असे फडणवीस म्हणाले.

मिसिंग लिंकवर दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना करणार

मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या घटनेने आपण काही गोष्टी शिकलो. पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते, हे आपल्याला लक्षात आले. त्यामुळे आता आपण आयआयटीमधील तज्ञांचा सल्ला घेऊन नव्या उपाययोजना करणार आहोत. जेणेकरून कदाचित पुढच्या वर्षी अशी घटना घडणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

112 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा

मुंबईत यंदा 112 टक्के नालेसफाई करण्यात आली असून मिठी नदीतील 83 टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. नालेसफाईतील गैरव्यवहार रोखण्यासाठी एआय आधारित शोध प्रणाली लागू करण्यात आली असून, खोटे दावे, चुकीची बिले आणि बनावट माहितीवर प्रभावी नियंत्रण आल्याचे त्यांनी सांगितले.

टीका करणारे लोक खोटारडे

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर काही लोकांनी अवाजवी टीका केली. एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील, असा संताप फडणवीस यांनी व्यक्त केला. टीका करणाऱया सगळय़ांच्या नाकावर टिच्चून सरकारने 18 तासांत मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्ववत केली. भविष्यात मिसिंग लिंकवरून आमच्यावर टीका करणारे शिल्लक राहणार नाहीत. पण 10 वर्षांनी मिसिंग लिंक असेल, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं नाव असेल. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, असे फडणवीस म्हणाले.

गिरते हैं शहसवार…

गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले, असा शेर फडणवीसांनी ऐकवला. अधिकाऱ्यांशी आणि तज्ञांशी चर्चा करून आम्ही हे काम करून दाखवले. हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे ते म्हणाले.

जिनको कुत्ता पूछता, वो सीएम को गाली देते है!

जिनको कुत्ता पूछता, वो सोशल मीडिया पर सीएम को गाली देते है… असे भाडय़ाचे तट्टू मिसिंग लिंकबाबत पैसे घेऊन सोशल मीडियावर लिहीत होते. या सगळ्यांना मी एकच सांगतो की, महाराष्ट्राचा अपमान कराल तर मी सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मुंबईसाठी 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा

मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे, सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याअंतर्गत शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचे पाणी अवघ्या 30 मिनिटांत बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.