
>> विजय जोशी
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. भूगर्भातील या अचानक झालेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक जण घराबाहेर पडले. ‘एमजीएम विज्ञान केंद्रा’चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी या भूकंपाच्या धक्क्यांची अधिकृत माहिती दिली आहे.
अवघ्या दोन तासांत चार धक्के
गुरुवारी मध्यरात्री ०१:३७ ते ०३:२३ या दोन तासांच्या कालावधीत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हे धक्के नोंदवले गेले. गेल्या सहा वर्षांत हिंगोली परिसरात ३७ पेक्षा जास्त सौम्य धक्के बसले असले, तरी एकाच दिवशी आणि अवघ्या दोन तासांत चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे.
मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतचे भूकंपाचे सविस्तर तपशील –
-
पहिला धक्का (पहाटे ०१:३७) – सिर्ली-पांग्रा शिंदे गाव परिसरात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला मुख्य धक्का जाणवला. याची खोली जमिनीखाली १० किलोमीटर इतकी होती. या धक्क्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले.
-
दुसरा धक्का (पहाटे ०२:१५) – काकडधाबा गावाच्या परिसरात ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. या धक्क्याची खोली देखील जमिनीखाली १० किमी होती.
-
तिसरा धक्का (पहाटे ०२:१७) – दुसऱ्या धक्क्यानंतर अवघ्या दोनच मिनिटांत पुन्हा काकडधाबा परिसरात ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा धक्का नोंदवला गेला.
-
चौथा धक्का (पहाटे ०३:२३) – पहाटे सव्वातीनच्या सुमारास काकडधाबा गावातच ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा चौथा धक्का बसला.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. pic.twitter.com/yimH01y2IK
— Saamana Online (@SaamanaOnline) July 9, 2026
६ वर्षांत ३७ पेक्षा जास्त धक्क्यांची नोंद
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत या तालुक्यांमध्ये गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि सौम्य धक्के बसण्याचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत या भागात ३७ पेक्षा जास्त वेळा अशा सौम्य धक्क्यांची नोंद झाली आहे. मात्र, आज मध्यरात्री लागोपाठ आलेल्या चार धक्क्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. pic.twitter.com/gE28b2WUIV
— Saamana Online (@SaamanaOnline) July 9, 2026




























































