‘मिट्रिफोरा’ वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध, ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनचे संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींचे संशोधन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’ने आणखी एक महत्त्वाचे संशोधन केले आहे. हिमालयात सापडणाऱ्या ‘मिट्रिफोरा’ या वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढण्यात फाऊंडेशनला यश आले आहे. अरुणाचल प्रदेशातील दापोरिजो परिसरात मिट्रिफोराची नवी प्रजात सापडली असून यासंदर्भातील संशोधन ‘फेडेज रिपर्टोरियम’ या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

तेजस ठाकरे यांच्यासह नवेंदू पागे आणि शिवम किश्वान यांनी हा शोध लावला आहे. अरुणाचलच्या अपर सुबान्सिरी जिह्यात दापोरिजो शहर आणि तलीहा गावाच्या दरम्यान एका ओढय़ाच्या काठावर सुमारे 410 मीटर उंचीवर ही नवी वनस्पती आढळली. सध्या तरी या प्रजातीचे फक्त एक झाड आढळले आहे.

मिट्रिफोरा ही वनस्पती सीताफळ कुळातील आहे. या कुळातील वनस्पतीची फुले मोठी आणि आकर्षक असतात. संशोधकांनी त्यावरील एकूण सहा फुलांचा अभ्यास केला असता तीन नर फुले आणि तीन उभयलिंगी फुले आढळून आली. या वनस्पतीची फुले मे ते नोव्हेंबर या कालावधीत फुलतात, तर नोव्हेंबरनंतर त्यास फळे येतात. जगभरात सध्या या वंशाच्या 53 ज्ञात प्रजाती आहेत.

नव्या संशोधनामुळे काय झाले?

  • हिंदुस्थानात मिट्रिफोराच्या प्रजातींची संख्या पाचवरून सहावर
  • हिमालयात मिट्रिफोराच्या दुसऱ्या प्रजातीची नोंद
  • हिंदुस्थानच्या वनस्पती जैवविविधतेत महत्त्वाची भर
  • एकाच झाडावर प्रथमच नर व उभयलिंगी फुलांचा शोध
  • अरुणाचलच्या जंगलात अनेक अज्ञात वनस्पती असण्याची शक्यता अधोरेखित

नव्या प्रजातीची वैशिष्ट्ये

  • मिट्रिफोराच्या नव्या प्रजातीच्या झाडाची उंची सुमारे सात मीटर असून ही झाडे सदाहरित असतात.
  • पाने जाडसर लंबगोलाकार असून 12-24.5 सेंमी लांब आहेत. त्यांचा रंग गडद हिरवा आहे.
  • वनस्पतीच्या एका फुलोऱ्यात जास्तीत जास्त आठ फुले आहेत. ही संख्या मिट्रिफोराच्या इतर प्रजातींपेक्षा जास्त आहे.
  • फुलाच्या बाहेरील आणि आतील पाकळय़ा जवळपास समान लांबीच्या आहेत. इतर प्रजातींमध्ये बाहेरील पाकळ्या मोठ्या असतात.
  • आतील तीन पाकळ्या एकत्र येऊन टोपीसारखा घुमट तयार झाला आहे. त्या घुमटाच्या आत पुकेसर आणि स्त्रीकेसर असतात.
  • फळे लांब, दंडगोलाकार, टोकदार देठ असलेली आहेत.
  • मिट्रिफोराच्या नव्या प्रजातीच्या झाडावर नर आणि उभयलिंगी अशी दोन प्रकारची फुले आढळली. नर फुलांमध्ये फक्त केसरदले आहेत, तर उभयलिंगी फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर दोन्ही आहेत. मिट्रिफोरामध्ये हे वैशिष्टय़ याआधी कधीही नोंदले गेले नव्हते.

कशी ओळखली नवी प्रजात?

संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील जंगलात प्रत्यक्ष निरीक्षण केले. नमुने गोळा केले. हिंदुस्थान व परदेशातील संग्रहालयांतील नमुन्यांशी तुलना केली. यासंदर्भात आधी प्रकाशित झालेल्या संशोधनांचा अभ्यास केला. त्यानंतर ही प्रजाती पूर्णपणे नवीन असल्याचे निश्चित झाले.

‘मिट्रिफोरा रश्मी’

मिट्रिफोराच्या नव्या वनस्पतीवरील फुलाला रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रिफोरा रश्मी’ असे नाव देण्यात आले आहे. ‘फेडेज रिपर्टोरियम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याबाबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे. वनसंपदा आणि वन्यजीव संशोधनात रश्मी ठाकरे नेहमीच तेजस ठाकरे तसेच ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या पाठीशी उभ्या राहिल्या, असे या लेखात नमूद केले आहे.