नाशिकच्या बदललेल्या रिंग रोडमध्ये जमीन घेणाऱ्यांची चौकशी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची (अलाइनमेंट) पुढील तीन दिवसांत चौकशी करण्यात येईल, तसेच रिंग रोडमध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या त्या प्रकरणाची चौकशी १५ दिवसांत केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाशिक रिंग रोडच्या अलाईनमेंटमध्ये जाणीवपूर्वक, उद्दिष्ट ठेवून बदल करण्यात आल्याचा आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनींचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. यामध्ये आमदार सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित करीत आक्षेप घेतले. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते.

मुख्य सचिवांमार्फत चौकशी रिंग रोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या तीन वर्षांत या भागात कोणी जमिनी खरेदी केल्या आहेत का, याचा शोध घेतला जाईल. जर ही अलाईनमेंट जाणीवपूर्वक बदलली गेली असेल, तर त्याची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांवरील आक्षेपाचीही तपासणी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर लोकप्रतिनिधींनी केलेल्या आक्षेपांची दखल घेत, या आक्षेपांची तपासणी मुख्य सचिवांच्या माध्यमातून करू, असे महसूलमंत्र्यांनी जाहीर केले.