ठाण्यात झाड कोसळून मृत्यू, पांडुरंग भुवड यांची मृत्यूशी झुंज अपयशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुफान पावसात अंगावर झाड कोसळून जखमी झालेले पांडुरंग भुवड यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ पांडुरंग यांच्यावर झाड पडले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्यातही झाड पडून पहिला बळी गेला आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण असून हा प्रशासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप ठाणेकर करत आहेत.

ठाण्यात जुलैपासून पावसाचा जोर वाढला असून गेले चार दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. यादरम्यान शेकडो झाडे, फांद्या कोसळल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या लुईसवाडी येथील आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी असेच एक भलेमोठे झाड कोसळले. त्यावेळी रस्त्याने जात असलेले धर्मवीरनगर येथे राहणारे पांडुरंग भुवड यांच्या डोक्यावर हे झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दृष्टीवर ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया
शहरात झाडे पडून आतापर्यंत चारजण जखमी झाले आहेत. यशोधननगर येथे दृष्टी कदम या तरुणीवर असेच झाड कोसळले. यात तिला छातीला आणि कमरेला जबर मार लागला असून तिच्यावर ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.