
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वारोळा गावात धक्कादायक घटना घडली. येथील रहिवासी नवनाथ गणपत पवार यांनी आर्थिक व्यवहारातील लाखो रुपयांची थकीत रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माजलगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दीपक जगन्नाथ जाधव (छत्र बोरगावकर) यांच्या स्वामी विवेकानंद नगर येथील निवासस्थानासमोर विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ पवार यांनी अनेक वर्षांच्या मैत्री व विश्वासाच्या नात्यामुळे दीपक जाधव यांना मोठी आर्थिक मदत केल्याचा दावा केला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही संबंधित रक्कम परत मिळाली नसल्याने न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी 15 जूनपासून आपल्या कुटुंबासह जाधव यांच्या घरासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते. परंतु तरीही जाधव हे पैसे देत नसल्याने शुक्रवारी जाधव यांच्या निवासस्थानासमोर सकाळी नवनाथ पवार यांनी कुटुंबीयां समवेत येऊन विषारी औषध प्राशन केल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला. “आमची थकीत रक्कम मिळावी, अन्यथा आमचा माणूस मेला तरी हरकत नाही,” अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे पाऊण तास चाललेल्या गोंधळानंतर महिला पोलिसांच्या उपस्थितीत पोलिसांनी नवनाथ पवार यांना ताब्यात घेऊन बळजबरीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या घटनेमुळे माजलगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून आर्थिक व्यवहाराच्या वादातून एवढे टोकाचे पाऊल उचलले गेल्याने विविध स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.






























































