
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला दोन दिवस उलटले तरी अजून आठ कामगार बेपत्ता आहेत. बचावकार्य अत्यंत संथगतीने सुरू आहे. घटनास्थळी बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. असे असताना पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी मात्र वारीत फुगड्या खेळण्यात दंग असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजीत पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे हे कामगार अजून ढिगाऱयाखाली असून कचरा डेपोच्या गेटवर नातेवाईकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक सेकंदाला त्यांच्या चेहऱ्यावरील भीती आणि चिंता वाढत आहे. आतून बाहेर येणाऱया प्रत्येक वाहनाकडे नातेवाईक धावत जात आहेत.
आयुक्त बचावकार्याबाबत खोटं बोलताहेत. त्यांना माणसाच्या जिवाशी घेणेदेणे नाही. ते फुगड्या खेळतात. आम्हीही वारकरी संप्रदायातील आहोत. पण सध्याची परिस्थिती त्यांनी समजून घ्यायला हवी. माणूस गेला तर तो परत येणार नाही, असा आक्रोश एका नातेवाईकाने केला. कंत्राटदार व अधिकाऱयांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
इतक्या गंभीर परिस्थितीत आयुक्तांसह प्रशासनाने घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेणे, पीडितांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे अपेक्षित होते. असे असताना घटनेच्या दुसऱ्या दिवशी आयुक्त डॉ. सूर्यवंशी हे पालखी सोहळय़ात महापालिका कर्मचाऱ्यांसोबत फुगडी खेळण्यात दंग होते. हा म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला.
ढिगाऱयातून बाहेर काढण्यात आलेल्या एका कामगाराने आत अडकलेले कामगार ‘आई… आई’ अशी आर्त हाक मारत मदतीची याचना करत असल्याचे सांगितले. त्यावर बोट ठेवत बांधकामे पाडण्यासाठी पोकलेन, बुलडोझर चालवले जातात मग येथे माणसे वाचवण्यासाठी तशी यंत्रणा का नाही, असा सवाल एका नातेवाईकाने केला.






























































