वांगचुक यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा, दीपकेंकडून उद्धव ठाकरेंचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील नीटसह अनेक परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीविरोधात लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्याची घोषणा केली. 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चाची हाक दिली असून त्या मोर्चात सहभागी होण्याचा मानस उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वांगचुक आणि दीपके यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी निर्दयी सत्ताधाऱयांविरुद्ध राज्याराज्यात रान पेटवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांना केले. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल अभिजीत दीपके यांनी उद्धव ठाकरे यांचे एक्स पोस्टच्या माध्यमातून आभार मानले.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत हे उपस्थित होते. “देशात सध्या विचित्र परिस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांचा अंदाधुंद कारभार सुरू आहे. बऱ्याच वर्षांनंतर देशात व महाराष्ट्रात विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे. कारण बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. पण रस्ते बांधणीचे ज्यांचे काम आहे ते नितीन गडकरी मात्र इथेनॉलवर बोलत आहेत,’’ असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.

हे हिणकस आणि नीच वृत्तीचे लक्षण

“अभिजीत दीपके हा युवक देशातील युवकांसाठी आवाज उठवतोय. त्याच्या आंदोलनातउतरलेले युवक सुशिक्षित आहेत. त्यांनी 20 तारखेला संसदेवर मोर्चा आयोजित केला आहे. पण तत्पूर्वीच आपल्या आंदोलनात गुंड सोडून हिंसाचार माजवून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा त्याचा आरोप आहे. सरकारचे हे कारस्थान म्हणजे हिणकस आणि नीच वृत्तीचे लक्षण आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

  • अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले होते तेव्हा तत्कालीन मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांची भेट घेऊन तिथे भाषण केले होते. अण्णांसोबत चर्चा करण्यासाठी विलासराव देशमुख यांची नियुक्ती केली होती. आज वांगचुक तिथे बसलेत. लोकांसाठी आंदोलन करत आहेत. पण सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी टीका या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
  • 2018मध्ये गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी जे.डी. अगरवाल यांनी 115 दिवस आमरण उपोषण केले होते. त्यात त्यांचे प्राण गेले, पण भाजप सरकारने त्याची काहीही दखल घेतली नव्हती, याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी या वेळी करून दिली.

….असे बोलले की महाराष्ट्राचा अपमान होतो

“अनेक पालक संतापले आहेत. आयुष्याची पुंजी लावून त्यांनी मुलांना शिकवले, पण पेपरफुटीमुळे सर्व एका क्षणात बरबाद झाले. नीटचे पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रात होते. अटका झाल्या पण पुढे काय? एकापाठोपाठ एक पेपर फुटत आहेत. शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलने झाली. पण कुणाला चिंता नाही. असे बोलले की मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा अवमान झाला असे वाटू शकते,’’ असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. देशात काय चाललेय याची काहीच पर्वा नाही, ते फक्त परदेशात फिरण्यात आणि भाडय़ाचे टट्टू आणून स्वतःचे स्वागत करण्यात, देशात सर्व आबादीआबाद असल्याचे दाखवण्यात मग्न आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला कमीपणा वाटतो का?

“एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद होत असेल, तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिथे एखाद्या सक्षम व्यक्तीची नियुक्ती केली, तर सरकारने कमीपणा मानण्याचे कारण काय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचा वांगचुक आणि अभिजीतच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. जिथे गरज असेल तिथे महाराष्ट्रात आम्ही उतरूच. पण देशातील सर्व पक्षांनीही त्यांच्या राज्यांमध्ये प्रमुख शहरांमध्ये या युवकांना बळ मिळेल असे प्रतिकात्मक आंदोलन करावे. तरच देशाची युवा शक्ती, देशाच्या भाग्यविधात्यांना कळेल की आपण त्यांच्यासोबत आहेत. हा विषय देशातील युवकांच्या भवितव्याचा आहे.

युवकांबद्दल आस्था आहे त्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आंदोलनात जावे. तामीळनाडूत स्टॅलिन आहेत. मुख्यमंत्री विजय थलपती आहेत. केरळ, कर्नाटकात कॉंग्रेस आहे. बंगालमध्ये ममता दीदी आहेत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आहेत. छत्तीसगढ, झारखंडमध्येही कुणी असतील त्यांनी रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.

हिंदुत्वाच्या नावावर मंदिरे लुटणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू

हिंदुत्वाच्या नावावर जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे त्याविरोधात शिवसेनेने रामरक्षा आंदोलनाचा पुकारा केला होता. गेल्या रविवारी दादर येथील हनुमान मंदिरात महाआरती व रामरक्षा पठण करून त्याची सुरुवात केली गेली होती. राज्याच्या विविध भागांमध्ये हे आंदोलन सुरू असून येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये होणाऱया आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागे राहिले पाहिजे. हिंदू धर्माचा दुरुपयोग करून कुणी मंदिरे लुटण्याचा कार्यक्रम करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

लोकशाही कुठे आहे?

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या समोर टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी आपले माईक ठेवत होते. त्यात लोकशाही वाहिनीचा माईक दिसत नव्हता. उद्धव ठाकरे सर्व माईक्सकडे पाहत मिश्कीलपणे म्हणाले की, लोकशाही कुठे आहे? त्यावर एकच हशा पिकला. संजय राऊत यांनीही त्यात भर घालत लोकशाही दबली गेली आहे, असे म्हटले आणि त्यांच्या समयसूचकतेला सर्वांनीच हसून दाद दिली. उद्धव ठाकरे यांनी आपल्यासमोरील लाईटही थोडा डीम करायला सांगितला. लाईट डोळ्यात जातो, मग पाणी आले की तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे भारावले, पाणावले, अशी कोपरखळी त्यांनी लगावली.

कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता आंदोलनात उतरा

20 जुलैच्या मोर्चाला तुम्ही जाणार का असे या वेळी पत्रकारांनी विचारले असता, वाटले तर आपण नक्कीच जाऊ पण इतर सर्व पक्षांनीही पक्षाचा झेंडा हाती न घेता या आंदोलनात उतरावे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावे, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ज्यांना शक्य नसेल त्यांनी जिथे आहात तिथेही वांगचुक आणि दीपके यांच्या समर्थनार्थ आंदोलन करावे, चहूबाजूंनी रान पेटेल त्यावेळी सरकारला या युवकांसमोर गुडघे टेकावे लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. फोडाफोडीच्या नीच राजकारणामुळे युवकांचा प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल, कोणताही राजकीय पक्ष आमच्यासोबत नाही असे त्यांना वाटत असेल तर शिवसेना त्यांच्यासोबत आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेना खासदार संसद दणाणून सोडणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होत आहे. त्या अधिवेशनात या मुद्दय़ावरून शिवसेनेचे खासदार संसद दणाणून सोडतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्व पक्षांच्या आणि अगदी भाजपच्या खासदारांनीही त्यांच्यात माणुसकीचा अंश शिल्लक असेल तर या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उपोषण सोडा, सगळे मिळून देश सांभाळू!

महिनाभरापूर्वीच वांगचुक मला भेटून गेले. त्यांच्या बुद्धिमत्तेचा देशाने उपयोग करून घ्यायला हवा. पण देशद्रोही ठरवून त्यांना तुरुंगात टाकले गेले होते. 16 दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. मी फोन करून प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती त्यांना केली. पण ते म्हणाले, माझे काहीही होऊ दे, पण देशाचे भले व्हायला हवे. मात्र वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल सरकारला काहीही पडले नाही. अशा एकेक व्यक्ती जर आपणहून जात असतील तर सरकारला ते हवेच आहे. तेव्हा वांगचुकजी, हात जोडून विनंती करतोय की, हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखी माणसे राहिली काय, नाही राहिली काय सरकारला फरक पडत नाही, पण तुमच्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे. कृपा करून उपोषण सोडा, आपण सगळे मिळून या देशाला सांभाळू, अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली.

देशाचे नशीब फुटतेय, सत्ताधाऱ्यांना मात्र पक्ष फोडण्यात रस

जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पेंद्रातील भाजप सरकारचा समाचार घेतला. “नीटचे पेपर फुटले. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्या विषयावर दीपके व वांगचुक यांनी आंदोलन सुरू केले आहे. देशातील प्रत्येक युवकाच्या भवितव्याचा तो विषय आहे. पण त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडाफोडीतच जास्त रस आहे. पण देशाचे नशीब फुटतेय, विद्यार्थी आत्महत्या करताहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. महिनाभर हा विषय सुरू आहे; पण दुर्दैवाने त्याबद्दल तीव्र लोकभावना उठली नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.