
हिंदुस्थानला ‘विश्वगुरू’ करण्याच्या बाता मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल कमालीच्या भडकल्या आहेत. ‘विश्वगुरू’ होण्याची स्वप्ने पाहणे चुकीचे नाही. मात्र, देशात सध्या नेमक्या त्याच्या उलट गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे एक तर त्या चुकीच्या गोष्टी बंद करा किंवा ‘विश्वगुरू’, ‘विश्वगुरू’ म्हणण्याचा मूर्खपणा थांबवा,’ असे खडे बोल पौडवाल यांनी सुनावले आहेत.
शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अनुराधा पौडवाल बोलत होत्या. ‘2047 पर्यंत हिंदुस्थान विश्वगुरू होणार असल्याचे बोलले जाते, याबद्दल तुम्हाला काय वाटते असा प्रश्न पौडवाल यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना देशातील सध्याची स्थिती आणि भाजपच्या ‘विश्वगुरू’केंद्री प्रचारावर पौडवाल यांनी परखड भाष्य केले. ‘काही वर्षांपूर्वींपर्यंत मलाही खूप वाटायचे की आपण विश्वगुरू बनू शकतो. पण आता असं दिसतं की विश्वगुरू होण्यासाठी जे काही करायला हवे, नेमक्या त्याच्या उलट गोष्टी देशात सुरू आहेत. एक तर या गोष्टी बंद व्हायला हव्यात किंवा मग ‘विश्वगुरू’, ‘विश्वगुरू’ हा जप बंद करावा,’ असे त्यांनी सुनावले.
- विश्वगुरू होणं हे चुकीचं नाही. मात्र विश्वगुरू होण्यासाठी काय करावे लागणार आहे. कोणते मार्ग आहेत. त्याची यादी द्या. जेणेकरून आम्ही त्या मार्गावर चालू शकू,’ असे त्यांनी सांगितले.
‘विश्वगुरू’चा पाया काय?
‘विश्वगुरू बनायचे असेल तर आम्हाला आधी शिक्षित व्हावे लागेल. पण देशात 93 लाख शाळा बंद पडल्या आहेत. हे पाहिल्यावर प्रश्न पडतो की विश्वगुरू होण्याचा पाया काय आहे? तो काहीतरी असला पाहिजे. नुसत्या स्वप्नांवर जगता येत नाही. काहीतरी ठोस असायला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
































































