
अभिनेता आमिर खानच्या तिसऱया लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच राजकीय क्षेत्रात मात्र वादंग निर्माण झाला आहे. भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी आमीरला थेट ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड अॅम्बेसेडर संबोधत त्याचे चित्रपट पाहण्याबाबत नक्कीच विचार करा, असे आवाहन करत आमीरच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचीच घोषणा केली. यामुळे भाजप नेते व कार्यकर्ते आता खरंच बहिष्कार टाकणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.आमिर खानच्या तिसऱया लग्नाचा संबंध ‘लव्ह जिहाद’शी जोडत मंत्री नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. हिंदू धर्माचे तरुण आमिर खानला सेलिब्रिटी मानतात. हिंदू समाज आणि हिंदू तरुणांनी कोणाचे चित्रपट पहावेत आणि त्यांना किती पाठिंबा द्यावा, याबाबत विचार केला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.
शिंदे गटाचाही पाठिंबा?
आमिर खानला लोक फॉलो करतात. काही वर्षांत तो चौथे लग्न करेल, त्यांना जणू काही लग्नांचा परवानाच मिळाला आहे. तो हा लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसेडर होऊ शकतो. पण सामान्य माणसाच्या मनातून तो उतरेल यात शंका नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना आता समाजासमोर उघडे पाडण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली आहे.
मंदिराच्या दानपेटीतल्या चोरीला कुठला जिहाद म्हणायचं – आदित्य ठाकरे
लव्ह जिहाद म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं की लॅण्ड जिहाद उज्जैनमध्ये कुणी केला? तर तो भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. अयोध्या मंदिरातील दानपेटीतल्या चोऱया कुणी केल्या? त्याला कुठला जिहाद म्हणायचं? असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.


































































