
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डेहराडून येथील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “गेल्या १० वर्षांत देशात १५२ वेळा पेपर फुटले आहेत, ज्यामुळे साडेसात कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, आतापर्यंत एकाही व्यक्तीला याची शिक्षा झालेली नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आजवर हिंदुस्थानात पेपरफुटी प्रकरणात एकाही व्यक्तीला शिक्षा मिळालेली नाही. पेपर फोडण्यासाठी आता उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही देशातील शिक्षणव्यवस्थेची दुर्दैवी अवस्था असून, पेपरफुटीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.”
विद्यार्थ्यांवर होणारे ‘चार अन्याय’
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर सध्या होत असलेल्या चार प्रकारच्या अन्यायांचा उल्लेख केला –
१. शिक्षणाचा वाढलेला खर्च.
२. संधींचे पाचपैकी चार दरवाजे बंद असणे.
३. १५० विद्यार्थ्यांमधून केवळ एका विद्यार्थ्याला यश मिळणे.
४. सर्वात मोठा आणि अंतिम अन्याय म्हणजे ‘पेपर लीक’.
“जे ९९.९ टक्के तरुण प्रामाणिक आहेत, त्यांना १ टक्का लोकांच्या या भ्रष्ट सिस्टीमच्या वापरामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे,” असेही ते म्हणाले.





























































