
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी शिवसेनेने मुंबईतून रामरक्षा आंदोलनाची ठिणगी पेटवली. या राज्यव्यापी आंदोलनाचा पुढचा टप्पा उद्या उपराजधानी नागपुरातून सुरू होत आहे. नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून आंदोलनाला रामभक्तांची मोठी गर्दी लोटणार आहे. यावेळी रामरक्षा पठण, हनुमान चालिसा आणि महाआरतीने नागपूरनगरी दुमदुमणार आहे. या आंदोलनाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
रामनगरातील श्रीराम मंदिरात रामरक्षा महाआरती केली जाणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
- रामरक्षा महाआरतीला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनासाठी नागपूरच्या राम नगरासह बाजीप्रभू देशपांडे चौक भगवामय झाला आहे.
सरसंघचालक भागवत आणि फडणवीसांना निमंत्रण
शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना रामरक्षा महाआरतीसाठी निमंत्रित केले आहे. राम मंदिरातील चोरीबाबत हिंदूंना जागे करण्यासाठी ही रामरक्षा चळवळ असून, नागपुरात रामरक्षा महाआरतीवेळी आपण अगत्याने यावे, असे संजय राऊत यांनी भागवत यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
स्थळ – श्रीराम मंदिर, रामनगर
वेळ – सायंकाळी 4 वाजता































































