शिवतीर्थावर देशभक्तीचे तुफान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छायाचित्रे : रुपेश जाधव, राजेश वराडकर

शिवतीर्थ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज तरुणाईने देशभक्तीचे तुफान निर्माण केले. विद्यार्थी, पालक, तरुण-तरुणी, नागरिक, सिनेकलाकार आदी मोठ्या संख्येने हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोस्टर्स आणि घोषणांद्वारे भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान यांचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या तिरंगा आंदोलनासाठी तरुणाईला आवाहन केले होते. कोणतेही राजकीय झेंडे न आणता फक्त राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन या आंदोलनात सहभागी व्हा, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार शिवतीर्थावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर हजारो तरुण हाती तिरंगा घेऊन आणि ‘भारतमाता की जय…’, ‘वंदे मातरम…’ अशा जोरदार घोषणा देत पोहोचले होते.

देशभक्तीपर गीतांच्या साथीने तरुणाईने आवाज बुलंद केला. अनेकांनी संविधानाची प्रत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमाही हाती घेतली होती आणि ती उंचावून दाखवत होते. डिजिटल वर्ल्डमध्ये वावरणाऱ्या तरुणाईने हाती घेतलेल्या पोस्टर्सवरही त्याची छाप दिसत होती. त्यात एआयचाही वापर केला गेला होता. इन्स्टाग्रामवरील जी भाषा असते ती आज पोस्टरच्या रूपाने तरुणांच्या हाती दिसली. क्रांतिकारक भगतसिंग आणि डॉ. आंबेडकर यांची पुस्तकेही तरुणांच्या हाती दिसत होती. गर्दीत जागा न मिळाल्याने अनेक तरुणांनी झाडांवर व जिथे मिळेल तिथे उभे राहून तिरंगा झेंडे झळकवले.

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे आंदोलनस्थळी आगमन होताच त्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्वागत केले गेले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘जय भवानी, जय शिवाजी…’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आदित्य ठाकरे यांनी हाती तिरंगा घेऊन तो झळकवला असता तरुणांच्या गर्दीनेही त्याला प्रतिसाद देत आपल्या हातातील तिरंगा झेंडे उंचावले.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, अंबादास दानवे, शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे, आमदार महेश सावंत, वरुण सरदेसाई, प्रियांका चतुर्वेदी, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह अभिनेते मकरंद देशपांडे आणि अतुल कुलकर्णी यांनीही तिरंगा फडकवत तरुणाईचा आत्मविश्वास वाढवला.

‘अच्छे दिन कब लीक होंगे’, ‘मत दिलं आहे, गप्प बसण्याचे काँट्रक्ट केले नाही’, धर्मेंद्र प्रधान तुम्ही राजीनामा कधी देणार असा सवाल आंदोलकांनी पोस्टर्सच्या माध्यमातून केला आणि आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. अनेक आंदोलकांच्या हातात संविधान होते. संविधान झळकावत आंदोलक घोषणा देत होते.

 

मोदी जब जब डरता है…

‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘मोदी जब जब डरता है, पुलिस को आगे करता है’, ‘चोर है चोर है मोदी सरकार चोर है’, ‘राजीनामा द्या राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ अशा आंदोलकांच्या घोषणांनी संपूर्ण दादर परिसर दणाणून गेला होता.

 

‘मेलोनीजी मोदी जी से जरा बात किजिए ना. धर्मेंद्र प्रधान का इस्तिफा लिजिये ना. वो आपका जरूर सुनेंगे’ असा टोलाही आंदोलकांनी लगावला. ‘मान जा बाबू, हमारे बच्चो का सवाल है’ असे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी सांगत असल्याच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले.

 

विद्यार्थ्यांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होत सरकारच्या हुकूमशाहीचा धिक्कार केला. तरुणाई रस्त्यावर असताना झोपलेल्या सरकारला जाब विचारण्यात आला.

आंदोलकांकडून शिस्तीचे दर्शन

तिरंगा आंदोलनात तरुणाईच्या शिस्तीचे दर्शन घडले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही कार्यकर्त्यांनी व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडत वाहनांना वाट मोकळी करून दिली. तसेच आंदोलनादरम्यान जमा झालेला कचरा, पाण्याच्या बाटल्या काही कार्यकर्त्यांनी पिशव्यांमध्ये भरून परिसर स्वच्छ केला.

तरुणाईच्या लढ्यात सेलिब्रिटी

सोनम वांगचुक आणि क्रॉकोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या तरुणाईच्या लढ्याला अनेक सेलिब्रिटींना पाठिंबा दिला आहे. आज अभिनेता अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, चिन्मय मांडलेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.

‘अच्छे दिन’ सांगून रस्त्यावर आणले

मोदी सरकारने मतं मागताना देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी आम्हाला ‘रस्त्यावर’ आणले, असा आरोप आंदोलकांनी केला. ‘आम्ही आता अच्छे दिन मागतच नाही आहोत. आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाहिजे,’ असे फलक आंदोलकांनी झळकावले. ‘नशीब सरकारने अभिजित दीपकेला ‘खलीद’ बनवून जेलमध्ये टाकले नाही, असा टोलाही पोस्टरच्या माध्यमातून सरकारला लगावला.

आंदोलनकर्त्याने ‘चायवाला चोर है’चे पोस्टर झळकावत मोदींचा निषेध केला.

‘प्राण जाये, पर रेसिगनेशन ना आये’ अशा आशयाच्या फलकांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यात आला.

‘जो जेन झी से टकरायेगा, कुर्सी से उतर जायेगा’ असे फलक आंदोलकांनी फडकावले.