
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचे म्हणत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ हकालपट्टी, विद्यार्थ्यांवर कथित अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली.
राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांची पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवणे. ते भ्रष्ट, अकार्यक्षम असून शिक्षणमंत्रीपदासाठी योग्य व्यक्ती नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण खात्यातून दुसऱ्या खात्यात हलवण्याची चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी याला तीव्र विरोध केला. धर्मेंद्र प्रधान यांना दुसऱ्या मंत्रालयात पाठवणे हा समस्येचा तोडगा नसून ते देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यवस्थेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची केवळ खातेबदल करून सुटका होणार नाही, तर त्यांना मंत्रिमंडळातूनच काढून टाकले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
विद्यार्थ्यांची दुसरी मागणी म्हणजे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचारासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करणे. राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या शेजारी उभी असलेली विद्यार्थिनी जखमी झाली आहे. काल त्यांनी अशा एका तरुणाची ओळख करून दिली होती, ज्याच्या डोळ्यात गोळी लागली आहे. तसेच हजारो विद्यार्थ्यांचे पाय आणि डोकी लाठीमारात जखमी झाली असून अनेकांच्या शरीरात छर्रे घुसले आहेत. या कारवाईचे नियोजन करणारे आणि ती प्रत्यक्ष राबवणारे अशा सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तिसरी मागणी मांडताना राहुल गांधी म्हणाले की, या संपूर्ण यंत्रणेचे प्रमुख असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांबरोबर आणि देशाच्या भवितव्याबरोबर जे घडले त्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली पाहिजे.
यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही धीर दिला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांवर हल्ला करणारी हीच व्यवस्था आहे. मी त्यांना आतमध्येही सांगितले की, घाबरू नका आणि चिंता करू नका. हिंदुस्थान सरकारची संपूर्ण यंत्रणा आणि सरकारमधील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला तरी तुम्हाला आंदोलनाच्या ठिकाणाहून हटवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.




























































