मोदी सरकारने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला होता, मराठी माणूस मोडेन पण वाकणार नाही! अभिजीत दिपकेचे जोरदार भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर मोदी सरकारने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला होता, मराठी माणूस मोडेन पण वाकणार नाही असे विधान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेने केले आहे. तसेच प्रधान यांनी जरी राजीनामा दिला असला तरी जोवर बाकी दोन मागण्या पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार अशी ठाम भूमिका दिपकेने मांडली आहे.

दिल्लीत आंदोलकांशी संवाद साधताना अभिजीत दिपके म्हणाला की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असे हे लोक म्हणायचे. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये. नीटचा पेपर लीक झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती, त्यांना न्याय मिळाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तर राजीनामा दिलेला आहे, जर तुम्ही या सरकारला घाबरला नाहीत, जर या सरकारविरोधात तुम्ही झुकला नाहीत तर चांगल्यात चांगल्या मंत्र्याचाही आपण राजीनामा घेऊ शकतो. आपल्या देशात लोकशाही आहे आणि आपण घाबरता कामा नये. जर बोलताना आपल्याला भिती वाटत असेल तर कसली लोकशाही? जर तुम्ही तुमचा आवाज बुलंद केला तरच हे लोक वठणीवर येतील. आज हे सत्ताधारी लोक स्वतःला राजे समजतात, त्याचे कारण आपण त्यांना सत्तेत बसवले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे पण आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. त्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, आम्ही कॉक्रोच आहोत, एकदा घुसलो तर सहजासहजी निघत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. ज्या पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला, त्या पोलिसांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी दिपकेने केली आहे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी मोदी शहांच्या सांगण्यावरून आंदोलकांवर लाठ्या चालवल्या. जर आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतो तर तुम्ही कोण आहात? 20 तारखेपासून ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजे, असेही अभिजीत दिपके म्हणाला.

गेल्या महिन्याभरापासून मला मोठ मोठे पत्रकार आणि राजकारणी विचारत होते की किती दिवस आंदोलन करणार? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही, तुम्ही या सरकारला ओळखताच. हे निर्दयी सरकार आहे आणि कुणाचेही ऐकत नाही, अशी टीकाही अभिजीत दिपकेने केली.

मला पंतप्रधान मोदींना सांगायचं की सुबह हो गई मामू. लोकशाहीची सकाळ झाली आहे आणि देशाची जनतेला जाग आली आहे. ही फक्त पहिलीच विकेट आहे, आता आम्ही थांबणार नाही ही फक्त सुरुवात आहे.

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला म्हणून मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो केलं म्हणून देशाचं वाटोळं झालेलं आहे. एका व्यक्तीला आपण संविधानापेक्षा आणि सर्व संविधानिक संस्थांपेक्षा मोठं केलं. असं जेव्हा होतं तेव्हा देशाचं वाटोळंच होतं, असो टोलाही लगावला.