
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत टीईटी, नीट, एसआरपीएफ, तलाठी भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यातच अन्न व औषध प्रशासन विभागासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर 12 लाखांत विकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे राज्यातील औषध निरीक्षक पदभरती गोत्यात सापडण्याची शक्यता आहे.
एमपीएससीकडून 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्चला नंदुरबारच्या काwटिल्य अकादमीतील काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील 90 टक्के प्रश्न उपलब्ध झाले होते. पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्सअॅपवर प्रश्न पाठवायचा आणि दोन-तीन मिनिटांतच ‘डिलिट फॉर ऑल’ करायचा. मात्र, एका विद्यार्थ्याने ते डाऊनलोड केलेले प्रश्न आपल्या मित्राला पाठवले, या गैरव्यवहाराचे डिजिटल पुरावे हाती लागले आहेत. गौरव पाटील यांनी यासंदर्भात एमपीएससीकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान ऋषिकेश गांगुर्डे नावाच्या परीक्षार्थीने 12 लाखांत या परीक्षेचा पेपर विकल्याचा दावा केला आहे.
21 जुलै ते 27 जुलै या कालावधीत काय घडले?
21 जुलै रोजी एका गौरव पाटील नावाच्या ई-मेल आयडीवरून 22 मार्चला जी परीक्षा झाली त्याची उत्तर पत्रिका फुटली असल्याबाबत आणि तिचा लाभ एका उमेदवाराला झाल्याची तक्रार आयोगाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने अधिकचे पुरावे सादर करण्यास तक्रारदार यांना सांगण्यात आले. त्यानंतर गौरव पाटील यांनी 23 जुलै रोजी पुरावे सादर केले. या अनुषंगाने या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. दिनांक 27 जुलै म्हणजे आज रोजी तक्रारदार आणि ज्यांना लाभ झाला आहे असं सांगितलं होतं ते उमेदवार यांना आयोगाच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. चौकशीसाठी या दोघांपैकी कुणीही आलेलं नाही. काल संध्याकाळच्या इमेलद्वारे तक्रारदार गौरव पाटील यांनी एक इमेल आयोगाला केला आणि ही तक्रार ऋषीकेश गांगुर्डे या त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून केल्याचं सांगितलं. गांगुर्डे हा परीक्षा उत्तीर्ण झालेला नाही. मात्र आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असल्याचे स्पष्टीकरण हरपाळकर यांनी दिलं आहे.
दहा दिवसांत कारवाई न झाल्यास दिल्लीसारखे आंदोलन – रोहित पवार
एमपीएससी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परीषद घेऊन सादरीकरण केले. या प्रकरणात बार्शीचे कनेक्शन दिसून येत आहे. एका नायब तहसीलदारची मुलं आहेत. त्याच्या एका मुलाला 13 वा रँक आणि मुलीला 16 वा रँक आला आहे. काही मुलांनी एमपीएससीकडे तक्रार केली, पण त्यावर कोणतेही उत्तर आयोगाकडून आलेले नाही. उलट अधिकारी विद्यार्थ्यांना तुमच्यावर पोलीस कारवाई करू, असे धमकावत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात दहा दिवसांत कारवाई झाली नाही तर दिल्लीसारखे रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
आयोगाचे म्हणणे काय?
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम सांगत पेपर फुटीचे आरोप फेटाळले आहेत. भरती प्रक्रियेतील पेपरफुटीच्या आरोपांची एमपीएससीने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, याप्रकरणी प्राथमिक तपास सुरू आहे. याबाबत खरी वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी तक्रारदारांचे सर्व ई-मेल, व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्ड्ससारख्या डिजिटल पुराव्यांची सखोल फॉरेन्सिक तपासणी करण्याबाबत आयोगाकडून लवकरच पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.






























































