
पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी अत्याचारावरून काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज लोकसभेत सरकारवर जोरदार तोफ डागली. विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्याचे आणि त्यांच्यावर बंदुका रोखण्याचे आदेश कोणी दिले होते, पंतप्रधानांनी की गृहमंत्र्यांनी, असा रोकडा सवाल प्रियांका यांनी केला. देशातील जनतेला याचे उत्तर हवे आहे, असे त्यांनी सरकारला ठणकावले.
परीक्षा पद्धती सुधारणा विधेयक 2026वर प्रियांका गांधी लोकसभेत बोलत होत्या. जंतरमंतरवर झालेले विद्यार्थी आंदोलन आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्दय़ावरून प्रियांका यांनी या वेळी सरकारला धारेवर धरले. ‘सरकारने जबाबदारीने वागावे, सरकारने उत्तरदायी असावे’ इतकीच जनतेची मागणी आहे. दुर्दैवाने मोदी सरकारला हे समजतच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वास्तवापासून खूप दूर गेले आहेत. पीआर, नवनवीन नरेटिव्हज आणि पाळीव मीडियाच्या मदतीने आपण निसटून जाऊ शकू, असा टोलाही प्रियांका यांनी हाणला.
देशात मेहनतीपेक्षा बेइमानीला महत्त्व आल्याचं मुलांना वाटतंय!
‘‘आपल्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन करणारी ही मुलं त्या हिंदुस्थानातील मुलं आहेत, जी गावात राहतात, महानगरात राहतात, छोट्या शहरांमध्ये, खेडय़ांमध्ये राहतात. या मुलांच्या स्वप्नासाठी त्यांची आई स्वतःचे दागीने विकते. वडील जमीन गहाण ठेवतात, अवघं कुटुंब आयुष्याची पूर्ण कमाई खर्च करतं. आज त्या मुलांना असे वाटू लागले आहे की, या देशात मेहनतीपेक्षा बेइमानीला महत्त्व आहे, असे प्रियांका म्हणाल्या.
धर्मेंद्र प्रधानांचा सत्कार करता? तुम्हाला कशाचा अभिमान वाटतो?
राजीनामा द्यावा लागलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वागत करण्याच्या भाजपच्या मानसिकतेवर प्रियांका यांनी सडकून टीका केली. तेव्हा महाराष्ट्रात पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या एका मुलीचे कुटुंब शोकसागरात बुडाले असताना तुम्ही प्रधानांना मुकूट घालता? प्रधानांचा सत्कार करून तुम्ही देशाला नेमका काय संदेश दिला? तुम्हाला कशाचा गौरव वाटतो, कशाचा अभिमान वाटतो? हा कुठला अहंकार आहे? लाजेने मान खाली घालण्यासारखी परिस्थिती असताना तुम्ही निर्लज्जपणे नगारे वाजवता? तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा खडा सवाल प्रियांका यांनी केला.
- ‘‘विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याची, अश्रुधुराचे गोळे डागण्याची, गोळीबार करण्याची काय गरज होती? मुलींचे कपडे फाडण्याची काय गरज होती? हे विद्यार्थी दहशतवादी होते का? हा प्रश्न फक्त काँग्रेसचा नाही तर देशाचा आहे. तरुणांच्या आई-वडिलांचा आहे. याचे उत्तर द्या. ही तुमची जबाबदारी आहे,’’ असे प्रियांका म्हणाल्या.
गोमूत्र एक्सपर्टला शिक्षणातलं काय कळणार?
2024मध्ये मंजूर झालेल्या विधेयकावर आज चर्चा करतोय. पेपरफुटीच्या गुह्यांत कठोर शिक्षा देण्याची तरतूद त्यात होती. मात्र तेव्हापासून एकाही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही. केवळ नव्या कमिटय़ा बनवून काही होणार नाही. राधाकृष्णन समितीसुद्धा शिक्षण व्यवस्थेत बदल आणण्यासाठी बनवली होती. मात्र त्याची एकही सुधारणा लागू केली नाही. नव्या समितीमध्ये एक गोमूत्र एक्सपोर्ट आहेत. त्यांना शिक्षणाचं काय कळणार, असा टोला प्रियांका यांनी हाणला.


























































