‘नीट यूजी’ परीक्षेच्या निकालात 70 गुणांची तफावत; विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव, आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
MBBS Exam

‘नीट-युजी’ 2026 परीक्षेच्या निकालात 70 गुणांची तफावत असल्याचा दावा करत एका विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली आहे. याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने निकालाला आव्हान देत उत्तरपत्रिकेची फेरपडताळणी करून सुधारित गुणपत्रिका व निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर उद्या गुरुवारी न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्ती विद्यार्थिनी स्नेहा गमणे हिने नीट-युजी 2026 परीक्षा दिली असून गुणपत्रिकेत तिला 340 गुण देण्यात आले आहेत, ओएमआर शीट व उत्तरपत्रिकानुसार तिला 410 गुण मिळणे अपेक्षित होते. 113 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली असून 46 प्रश्नांची उत्तरे चुकीची आहेत. तसेच एक प्रश्न वगळण्यात आला आहे. गुणांकन पद्धतीनुसार तिच्या गुणांमध्ये 70 गुणांची तफावत आढळल्याने तिने याप्रकरणी हायकोर्टात अॅड. विवेक आरोटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याची दखल घेत या याचिकेवर उद्या गुरुवारी सुनावणी ठेवली.

उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक पदाचाही पेपर फुटला?

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पद भरती परीक्षेचाही पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येत असून हे प्रकरण नागपूर न्यायालयात पोहोचले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील आदेश येईपर्यंत या भरती प्रक्रियेवर ‘जैसे थे’चे ठेवण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी न्यायालयाने गृह सचिव, उत्पादन शुल्क आयुक्त आणि राज्य सेवा आयोगाला नोटीस पाठवली असून 4 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत

नीट फेरपरीक्षेचाही पेपर लीक, रोहित पवार यांचा आरोप

नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने देशभरात वादळ उठले. पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणे भाग पडले, मात्र पेपरफुटीचे सत्र सुरूच असून नीटचा पेपर फुटल्यानंतर घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचाही पेपर तीन दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये फुटल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.