
दारू पार्टी सुरू असताना भाजप सरपंचाच्या तर्राट पतिने हवेत अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना नालासोपारा परिसरातील कळंब गावानजीक असलेल्या तुलसी रिसॉर्टमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या संदेश गुरव याला अटक केली आहे. गुरव याने गोळीबार करीत घातलेल्या धिंगाण्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या प्रकारामुळे रिसॉर्ट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भिवंडी तालुक्यातील कवाडखुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी गुरव यांचा पती संदेश गुरव (३२) हा आपल्या मित्रांसह पार्टीसाठी तुलसी रिसॉर्टमध्ये आला होता. संदेश गुरव हा बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करतो. मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास दारूच्या नशेत आणि अतिउत्साहाच्या भरात संदेश गुरव याने स्वतःकडील बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. यावेळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल समुद्रकिनारा परिसरात गस्त घालत होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी तातडीने तुळशी रिसॉर्टकडे धाव घेतली आणि अर्नाळा सागरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता त्यांना वापरलेल्या काडतुसाची रिकामी भोंगळी आढळली. मात्र अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी संदेश गुरव याच्याकडून बिनपरवान्याचा गावठी रिव्हॉल्व्हरा आणि आणखी जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुरव याला ताब्यात घेतले आहे.
गोळीबार प्रकरणाचा अधिक तपास अर्नाळा सागरी पोलीस करीत आहेत. आरोपीकडे हे शस्त्र कसे आले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि शस्त्राचा स्रोत कोणता आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
कळंब येथील याच तुलसी फार्म हाऊस रिसॉर्टमध्ये मे महिन्यात स्विमिंग पूलमध्ये पडून अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा याच रिसॉर्टमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.































































