अमित शहा जास्त दिवस लपून बसू शकत नाहीत, एक दिवस आम्ही खेचून बाहेर काढू! राज्यसभेत मल्लिकार्जून खरगे आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान गुरुवारी राज्यसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईसाठी खरगे यांनी थेट गृहमंत्र्यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “गृहमंत्री सभागृहात येत नाहीत, पण ते जास्त दिवस बंद खोलीत लपून बसू शकत नाहीत, जनशक्ती त्यांना एक दिवस खेचून बाहेर काढेल”, असा आक्रमक इशारा खरगे यांनी दिला.

विद्यार्थ्यांवर झालेल्या बळाच्या वापराला जबाबदार कोण? असा सवाल करत खरगे म्हणाले की, “याचे जबाबदार स्वतः गृहमंत्री आहेत. ते बंद खोलीत बसून माझे बोलणे ऐकत असतील, पण ते जास्त दिवस असे लपून बसू शकत नाहीत. एक दिवस आम्ही त्यांना बाहेर खेचून आणू आणि जनतेसमोर उभे करू.” खरगे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात, “पेपर चोरणारे वाचत राहिले आणि मेहनत करणारे मार खात राहिले…” या ओळींनी करत सरकारवर निशाणा साधला.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकांवरून जोरदार गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी यावर तीव्र आक्षेप घेत म्हटले की, विरोधी पक्षनेत्यांनी भावनेच्या भरात असंसदीय शब्दांचा वापर करू नये. त्यांनी सभापतींकडे हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.

यावर स्पष्टीकरण देताना खरगे म्हणाले, “मी कधीही असंसदीय शब्दांचा वापर करत नाही. आम्ही याचा अर्थ जनशक्ती आणि विद्यार्थी आहेत, जे त्यांना खेचून बाहेर आणतील. त्यांनी किमान सभागृहात येऊन बसावे, ऐकावे आणि उत्तरे द्यावीत.”