केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; मुसळधार पावसामुळे गौरीकुंड ट्रेकिंग मार्ग आणि महामार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा गुरुवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. गौरीकुंड गेटच्या जवळपास २०० मीटर आधी दरड कोसळल्याने ट्रेकिंग मार्गावर मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि मोठे खडक जमा झाले आहेत. परिणामी भाविकांचा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यात्रेला त्वरित स्थगिती दिली आहे. मार्गात अडकलेल्या सर्व भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांना प्रशासनाच्या अधिकृत परवानगीशिवाय पुढे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून रस्ता खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र सतत कोसळणारा पाऊस आणि टेकडीवरून सातत्याने खाली पडणाऱ्या दगड-मातीमुळे मदत आणि रस्ता मोकळा करण्याच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले हे. याव्यतिरिक्त मुनकटियाजवळ केदारनाथ महामार्गावरही दरड कोसळल्याने आणि रस्त्यावर खडक आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

जिल्हा दंडाधिकारी विशाल मिश्रा यांनी महामार्गावरील प्रभावित भागांची पाहणी केली असून रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवारी रात्री उशिरा आणि गुरुवारी पहाटे केदारनाथ महामार्गासह अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ट्रेकिंगचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्यानंतर आणि भाविकांसाठी तो १०० टक्के सुरक्षित घोषित केल्यानंतरच केदारनाथ यात्रा पुन्हा सुरू केली जाणार आहे. तोपर्यंत सर्व भाविकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.