
दादरमधील सौ. मीनाताई ठाकरे फूल मार्केटजवळील मराठी फूल विक्रेते, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या कॅरेटवर पालिकेने कोणतीही सूचना न देता मुजोरपणे अचानक बुलडोझर चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी फूल विक्रेत्यांनी जोरदार विरोध करीत पालिका अधिकाऱयांना धारेवर धरले. अखेर फूल विक्रेत्यांच्या संतापामुळे पालिकेच्या कारवाई पथकाने या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
दादरच्या फूल मार्केटजवळ गेल्या अनेक वर्षांपासून फूल विक्रेते व्यवसाय करीत आहेत. यामध्ये मराठी फूल विक्रेत्यांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी पालिकेने बुधवारी अचानक माल साठवलेल्या कॅरेटवर बुलडोझर चालवत कारवाई सुरू केली. त्यामुळे फूल विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कारवाईला विरोध केला.
पालिकेचे अधिकारी आहात तर ओळखपत्र दाखवा, नोटीस दाखवा अशी मागणी यावेळी फूल विक्रेत्यांनी केली. मात्र पालिका अधिकाऱ्याकडून ओळखपत्र किंवा नाव सांगण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कारवाई थांबवा, अन्यथा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी पालिका अधिकारी कारवाई थांबवून त्या ठिकाणाहून निघून गेले. पालिकेने मुजोरपणे सुरू केलेल्या कारवाईत शुक्रवारी होणाऱया प्रभाग समितीच्या बैठकीत आवाज उठवण्यात येईल, अशी माहिती नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिली.































































