आम्ही टिळक-गांधींच्या परंपरेला मानणारे लोक, टिळकांच्या नावाचा बाजार पुणेकर जनता मान्य करणार नाही – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्यात येत असून त्यांच्या हस्ते ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारवर टीका केली आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा बाजार पुणेकर जनता मान्य करणार नाही, असे सांगत संजय राऊतांनी या पुरस्कार सोहळ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

इस्ट इंडिया कंपनीशी दोन हात करणाऱ्या टिळकांचा पुरस्कार शहांच्या हस्ते?

दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकमान्य टिळकांसारखा स्वातंत्र्य लढ्यातील कर्तापुरुष, ज्याने स्वाभिमानाने, अभिमानाने आणि शौर्याने इस्ट इंडिया कंपनीशी दोन हात केले आणि तुरुंगवास भोगला; त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ‘इस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक’ असलेल्या अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट कोणी घातला असेल तर, त्यांच्या बुद्धीची मला किव येते, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

गृहमंत्र्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे

दिल्लीतील जंतरमंतरवर हुकूमशाहीविरोधात लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहांचे होते, असा आरोप राऊतांनी केला. ‘देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत. अशा व्यक्तीच्या हस्ते महान लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार देण्याचा घाट घातला जात आहे’, असे सांगत त्यांनी या पुरस्काराला विरोध करणाऱ्या पुणेकरांचे अभिनंदन केले. तसेच, पुण्यात अमित शहांच्या विरोधात आंदोलनाची पोलिसांनी परवानगी नाकारणे ही ‘साम्राज्यशाही’ असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.

आम्ही टिळक-गांधींच्या परंपरेला मानणारे लोक

टिळकांच्या वंशजांनी यामध्ये राजकारण आणू नका असे म्हटले आहे, यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, मग अमित शहा कोण आहेत? बाबा आमटे की शिवाजीराव पटवर्धन आहेत. कोण आहेत? नैतिकदृष्ट्या हे अध:पतन आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाने चालणारा हा बाजार पुणेकर जनता मान्य करणार नाही. गृहमंत्री म्हणून जर योग्य व्यक्ती असती तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना जे गृहस्थ हे सगळं घडताना गप्प राहिले त्यांना शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जातो. हे कसले पुरस्कार? दुर्दैवाने हे विधान कराव लागत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या आहेत. आम्ही टिळक भक्त आहोत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि सरदार वल्लभभाई पटेल या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत. टिळकांचा जहालपणा आम्ही आमच्या लेखणीतून आणि वाणीतून सातत्याने व्यक्त केला आहे, त्यामुळे टिळकांच्या संदर्भात भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरूणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले.