मालक एकच… बाकी सारे कुत्रे! फेसबुक पोस्टवरून भाजपमध्ये कलह; मुनगंटीवार-जोरगेवार समर्थकांमधील वाद विकोपाला, पोलीस ठाण्यात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपमधील अंतर्गत वाद आता सोशल मीडियावर पोहोचला आहे. भाजप आमदारांचे समर्थक त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर सोशल मीडियावरील कथित पोस्टमधून खालच्या पातळीवर टीका करत आहेत. या सोशल मीडियावरील कथित पोस्टवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह मजकूर आणि AI च्या माध्यमातून तयार करण्यात आलेले छायाचित्र सोशल मीडियात शेअर केले गेले. यामुळे  भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक असलेले अजय सरकार याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृती अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी जोरगेवार समर्थक भाजप पदाधिकारी आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील दहा नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

आमदार जोरगेवार यांच्याबाबत फेसबुकवर कथित बदनामीकारक मजकूर आणि संपादित छायाचित्र प्रसिद्ध केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये ‘मालक एकच… बाकी सारे कुत्रे!’ असा मजकूर लिहिल्याने व इतर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे या निवेदनातून सांगण्यात येत आहे. सोबतच समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा सुद्धा या निवेदनात करण्यात आला आहे. अजय सरकार याला यापूर्वी तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तो सोशल मीडियावर सक्रिय असून विविध पोस्टद्वारे वारंवार बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आली आहे. कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.