IND vs SL – जसप्रीत बुमराह ठरला फिट, श्रीलंकेच्या मालिकेसाठी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी संघाच्या गोलंदाजीचा कणा असणारा जसप्रीत बुमराह श्रीलंकेच्या फलंदाजांना धडकी भरवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत झालेल्या दुखापतीनंतर बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, बुमराहने बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये झालेली सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीरीत्या पार केली. त्यामुळे लंकेविरुद्धच्या मालिकेतील सहभागाचा त्याचा मार्ग मोकळा झाला असून हिंदुस्थानच्या गोलंदाजीची धार तीक्ष्ण झाली आहे.

या दौऱयात हिंदुस्थानचा संघ दोन कसोटी, तीन एकदीवसीय आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयातील पहिल्या कसोटी सामन्याला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहला इम्पॅक्ट इंज्युरी झाली होती. त्यामुळे लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात त्याला विश्रांती घ्यावी लागली होती. मात्र पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून त्याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, बुमराह दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सने निर्धारित केलेल्या सर्व फिटनेस चाचण्या त्याने उत्तीर्ण केल्या असून श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे.

हिंदुस्थानच्या संघाला दुखापतींचे ग्रहण

हिंदुस्थानच्या संघ अद्यापही दुखापतींच्या संकटातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. वेगवान गोलंदाज हर्षित राणा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. नितीश रेड्डीदेखील मांडीतल्या स्नायूच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार आहे. आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराहचे पुनरागमन हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजीसाठी मोठे बळ देणारे असून, आगामी कसोटी मालिकेत त्याच्यावर संघाच्या गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी असणार आहे.