संस्कृतायन – कालिदासाची स्वप्ननगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]

महाकवी कालिदासाच्या मेघदूतात वर्णन केलेली अलकानगरी जी माणसाच्या सुखाच्या कल्पनेचा जणू उत्कर्षच मांडते. माणसाच्या मनात वसलेल्या परिपूर्ण जगण्याच्या आकांक्षेचे प्रतीक ठरणारी ही स्वप्ननगरी, जिथे सौंदर्य आहे, प्रेम आहे, शांती आहे आणि मनाला पूर्णत्वाची अनुभूती देणारा आनंद आहे. कालिदासाच्या काव्यप्रतिभेची जादू या नगरीच्या वर्णनातून ओसांडून वाहताना दिसते.

कालिदासाच्या ‘मेघदूत’मधील अलका नगरी ही संस्कृत साहित्यातील सर्वांत मोहक आणि चिरंतन कल्पनानिर्मितींपैकी एक मानली जाते. ही केवळ कुबेराची राजधानी नाही, तर मानवी कल्पनाशक्तीने घडवलेली सौंदर्य, समृद्धी आणि आनंद यांची आदर्श नगरी आहे. हिमालयाच्या कुशीत, कैलास पर्वताच्या सान्निध्यात वसलेली ही नगरी प्रत्यक्षात अस्तित्वात नसली, तरी कालिदासाच्या शब्दांमधून ती इतकी जिवंत उभी राहते की प्रत्येक वाचकाला ती आपलीच स्वप्ननगरी वाटू लागते.

कशी आहे अलकानगरी? स्वर्गसुखच जणू तिथे ओसंडून वाहते आहे. शांताबाई शेळके यांनी हा रसिकतेने केलेला अनुवाद पाहू.

वृक्ष तेथले सदाच फुलले
भ्रमर जयांवर नित्य गुंजती
हंसमालिका जणू मेखला
नित्य विकसल्या कमलिनिभवतीं
सदनिं पाळले मोर केकती
झळझळता पसरून पिसारा
चांदण्यांत नित रजनी न्हाती
पूर्णशशीच्या स्रवता धार

अलका नगरीत ऋतू एकच – वसंत ऋतु. अशी ही सदाबहार नगरी. अंगणात पाळीव मोर फिरत आहेत. आणि नित्य पौर्णिमाच आहे. जिथे चंद्रालाही क्षयाचा शाप नाही तिथे उणीव नावाची गोष्ट शोधूनही सापडत नाही. यानंतर कालिदासाने माणसाच्या सुखाच्या कल्पनेचा उत्कर्ष मांडला आहे.

आनंदाश्रू नयनीं केवळ
अन्य तयांना निमित्त नाहीं
मीलनसुख अंतरतां त्यांना
मदनशरांविण नसे व्यथाही
प्रणयकलह झाल्यास घडे तो –
तोच तेवढा वियोग त्यांतें
विचित्र सारे – वयहि न दुसरें
तारुण्याविण यक्षजनातें!

– डोळ्यात अश्रू आलेच तर आनंदाचे तेवढे येतात. सदा सर्वदा येथील प्रेमिक मिलनच अनुभवतात. उदरनिर्वाहासाठी दूरदेशी जाण्याची वेळ नाही, प्रियजनांपासून ताटातूट नाही, आयुष्याच्या धकाधकीने प्रेमाला विराम नाही. विरह वाटय़ाला येईलच कशाला? वियोगही घडलाच तर कधी घडतो? उगीच प्रेमातले लुटुपुटूचे भांडण झाले तरच! आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे इथे वार्धक्यच नाही. सगळे चिरतरुण आहेत. याहून अधिक सुखाची कल्पना आपण पामर काय करणार, नाही का?

अलकेत दुःखाला स्थान नाही, अभावाची जाणीव नाही आणि निसर्ग व मानवी जीवन यांच्यात कोणताही संघर्ष नाही. येथे ऋतू नेहमीच प्रसन्न आहेत, वृक्ष सदैव फुलांनी बहरलेले आहेत, नद्या निर्मळ आहेत, प्रासाद रत्नजडित आहेत आणि प्रत्येक क्षण सौंदर्याने ओथंबलेला आहे. या नगरीत ऐश्वर्य आहे; पण ते केवळ संपत्तीचे प्रदर्शन नाही. ते कला, प्रेम, संगीत, निसर्ग आणि संवेदनशील जीवनशैली यांचे वैभव आहे.

याच कारणामुळे अलका ही फक्त एक पौराणिक नगरी राहत नाही; ती प्रत्येक माणसाच्या मनात वसलेल्या परिपूर्ण जगण्याच्या आकांक्षेचे प्रतीक बनते. जिथे सौंदर्य आहे, प्रेम आहे, शांती आहे आणि मनाला पूर्णत्वाची अनुभूती देणारा आनंद आहे, अशा आदर्श विश्वाचे नाव म्हणजे कालिदासाची अलका नगरी.

या रसमयी शृंगारनगरीत प्रणयाचे वर्णन तर येणारच, पण कालिदास अनुरागाची नाजुक मेंदी काढल्यासारखे ते वर्णन करतो. आता हाच प्रसंग पहा – एकांतामध्ये सजणाच्या सहवासात असताना तिचे रेशमी वस्त्र सुळसुळीत असल्यामुळे पटकन गळून पडू पाहत आहे. ते तिला सावरता तर येत नाही, मग निदान आपली ही तारांबळ अंधारात लपवावी म्हणून ती पटकन तिथे असलेला अंगराग किंवा कसले तरी चूर्ण म्हणा, ते दिव्यावर टाकते. का तर दिवा विझेल. पण तिच्या लक्षातच येत नाही. तिच्या साजणाच्या वैभवशाली प्रासादात रत्नांचे दिवे आहेत.

हात घालतां सजण निरीला
सैल रेशमी वसन ओघळे
लाजुनियां बावरती ललना
काय करावें आतां न कळे
अंगराग उधळिती मुठींनें,
प्रकाश तिमरीं बुडवूं बघती
ज्योत उंच पण तशीच झळके
रत्नदीप ते मुळीं न विझती

त्यातही गंमत बघा, कालिदास अलकेचे वैभव स्वतंत्रपणे सांगत नाही. तो फक्त एक प्रणयप्रसंग रंगवतो; पण त्या एका प्रसंगातून त्या नगरीची संपन्नता, सौंदर्यदृष्टी आणि विलासमय जीवनशैली सहज उलगडते. हीच त्याच्या काव्यप्रतिभेची खरी जादू आहे. रत्नदीपांची ही कल्पना भारताचे सुवर्णयुग अनुभवलेला कालिदासच करू शकतो, नाही का? गुप्त साम्राज्याच्या सुवर्णयुगात भारताची कला, संस्कृती आणि समृद्धी अभूतपूर्व वैभवाने बहरली होती. त्या वैभवशाली युगाचा साक्षीदार असलेल्या कालिदासाच्या कल्पनाशक्तीलाही त्या संपन्न संस्कृतीची सुवर्णझळाळी लाभली होती. म्हणूनच अलकेतील रत्नदीप, रत्नजडित प्रासाद आणि ऐश्वर्याने नटलेले जीवन हे केवळ कवीच्या कल्पनेचे उड्डाण वाटत नाही; ते एका वैभवशाली संस्कृतीच्या स्मृतींना लाभलेले काव्यमय रूप भासते. आता यक्षपत्नीची भेट होईल, पण पुढील भागात.
(खिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)