
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दहाव्या दिवशी पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी दोन पदके आपल्या नावावर केली. प्रवीण चित्रावेलने 16.58 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह रौप्यपदक पटकावले, तर 21 वर्षीय सेल्वा प्रभूने 16.52 मीटरची झेप घेत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. सुवर्णपदक जमैकाच्या जॉर्डन स्कॉटने जिंकले.
हिंदुस्थानी खेळाडूंची अॅथलेटिक्समधील ही आणखी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. एका स्पर्धेत दोन हिंदुस्थानी खेळाडूंनी पोडियमवर उभे राहत हिंदुस्थानचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकावला. प्रवीणने पहिल्याच प्रयत्नापासून सातत्य राखले. 16.05 मीटरने सुरुवात केल्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात 16.31 मीटर, तर चौथ्या प्रयत्नात 16.58 मीटरची सर्वोत्तम उडी घेत रौप्यपदक निश्चित केले. पाचव्या प्रयत्नात त्याने 16.40 मीटरची उडी मारली, तर अखेरचा प्रयत्न फाऊल ठरला.
सेल्वा प्रभूनेही स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी कामगिरी उंचावत नेली. 15.87 मीटरपासून सुरुवात करत त्याने दुसऱया प्रयत्नात 16.17 मीटर, तिसऱया प्रयत्नात 16.43 मीटर अशी प्रगती केली. चौथा प्रयत्न फाऊल गेल्यानंतर पाचव्या प्रयत्नात 16.52 मीटरची दमदार झेप घेत त्याने कांस्यपदकावर नाव कोरले.
लव्हलिना आणि नरेंदर यांना रौप्यपदक
हिंदुस्थानच्या लव्हलिना बोरगोहेन आणि नरेंदर बेरवाल यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लव्हलिना महिलांच्या 75 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या एमा-सू ग्रीनट्रीकडून अंतिम फेरीत पराभूत झाल्याने सुवर्णपदकापासून वंचित राहिली. ऑस्ट्रेलियन बॉक्सरने तिसऱ्या फेरीत 4-1 अशी आघाडी घेतली, ज्यामुळे लव्हलिनाला रौप्यपदक मिळाले. नरेंदरला 90 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.
उन्नती शर्माला ज्युडोमध्ये कांस्यपदक
हिंदुस्थानच्या उन्नती शर्माने महिलांच्या 63 किलो ज्युडो प्रकारात कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या सामन्यात तिने दक्षिण आफ्रिकेच्या स्काय क्नोस्टरला इप्पॉनद्वारे पराभूत करून हिंदुस्थानला ज्युडोमध्ये आणखी एक पदक मिळवून दिले. हा विजय मिळवण्यासाठी उन्नतीला केवळ 1 मिनीट आणि 7 सेकंद लागले.
























































