ट्रम्प यांची माघार, इराणवरील हल्ले थांबवले; होर्मुझचा मार्गही खुला होणार, आखाती देशांची शिष्टाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगाचा इंधन पुरवठा विस्कळीत करणाऱ्या इराण युद्धावर तोडगा निघण्याची पुन्हा आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे घेत इराणवरील हल्ला तूर्त रद्द केला आहे. इराण आणि आखाती देशांसोबत झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असून यासंदर्भात ट्रम्प यांनी टथ या सोशल मीडियावरून माहिती दिली. होर्मुझचा मार्ग खुला करणे आणि इराणच्या आण्विक धोक्याला नष्ट करणे यासंदर्भात या देशांमध्ये सहमती झाली असून शांतता कराराच्या रूपरेषेलादेखील मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायल इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. शनिवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना पश्चिम आशियातून तातडीने बाहेर पडण्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ट्रम्प यांनी हल्ला टाळण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीदेखील ट्रम्प यांनी अशा प्रकारे मोठे हल्ले करण्याची धमकी दिली होती. मात्र ऐनवेळी माघार घ्यावी लागली. यावेळी जगाच्या भविष्यातील फायद्यासाठी आणि त्याचप्रमाणे एका यशस्वी व समृद्ध इराणच्या अस्तित्वासाठी मी हा हल्ला रद्द करण्यास सहमती दर्शविली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

सौदी अरबचा पुढाकार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून इराणवरील हल्ला टाळावा आणि संयम बाळगण्याची विनंती केली होती. आखातातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेला प्राधान्य देणे आवश्यक असून युद्धबंदीच्या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, असे सलमान यांनी ट्रम्प यांना सांगितले.

इराणच्या इशाऱ्यानंतर आखाती देश नरमले

ट्रम्प यांनी मोठय़ा हल्ल्याची धमकी दिल्यानंतर इराणने गंभीर इशारा दिला होता. हल्ला झाल्यास त्याचे पडसाद केवळ अमेरिका किंवा इस्रायलपुरते मर्यादित राहणार नाहीत; सौदी अरब, यूएई, कतार आणि संपूर्ण आखातातील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल असा इशारा इराणने दिला होता. यामुळे विशेषतः सौदी अरेबियामध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. इराणच्या इशाऱ्यानंतर आखाती देशांनी नरमाईची भूमिका घेतली.