
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक अर्चना कुटे (रा. हिरालाल पेठ, बीड) व आशा पाटोदेकर (रा. सोलापूर) या दोघींना अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघींना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीरामपूर न्यायालयाने दोघींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीरामपूर येथील ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये अडकले असून, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 29 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच जामखेडमधील ठेवीदारांचेही पैसे अडकले असून, 19 जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात 7 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही गुन्हे तपासकामी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. दोन्ही गुह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यापूर्वी चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक केली होती. दरम्यान, संचालक अर्चना कुटे व आशा पाटोदेकर या दोघींना बीड पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघी बीड पोलिसांच्या ताब्यात होत्या. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघींना बीड पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात अटक करण्यात आली आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये चार हजार कोटींच्या ठेवी अडकल्या
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील ठेवीदारांच्या सुमारे चार हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या मल्टिस्टेटचा चेअरमन सुरेश कुटे याच्यासह संचालक मंडळाविरुद्ध बीड, छत्रपती संभाजीनगर जिह्यातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी अहिल्यानगर जिह्यातील जामखेड व श्रीरामपूर येथील ठेवीदारांच्या ठेवी दिल्या नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह 15 जणांविरुद्ध, तर जामखेड पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































