
इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, वर्गीस कुरियन, प्रणव मुखर्जी, शीला दीक्षित, एस. एम. जोशी, गोदावरी परुळेकर, श्रीपाद अमृत डांगे, अब्दुल गफार खान, अच्युतराव पटवर्धन, अटलबिहारी वाजपेयी, मधू लिमये, प्रकाश विकास आमटे, सॅम पित्रोदा अशा महान विभूतींना याआधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यामुळे टिळक पुरस्काराचे तेज वाढले. मात्र पुण्याचे तेज, प्रतिष्ठा कमी करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्या कृत्यात महान लोकमान्य टिळकांचे वंशज असावेत हे बरे नाही. दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मिंध्यांना महादजी शिंदे पुरस्कार देणे व डोवाल साहेबांना ‘टिळक’ पुरस्कार देणे हे महाराष्ट्रीय समाजाचे अधःपतन आहे.
एकेकाळी भारतातील पुरस्कारांना जगभरात प्रतिष्ठा होती. मोदी काळ आल्यापासून सर्वच राष्ट्रीय पुरस्कारांतही घोटाळे सुरू झाले आहेत. अलीकडच्या ‘पद्म’ पुरस्कारांविषयी तर बोलायलाच नको. देशातील काही मान्यवर संस्था व कुटुंबांतर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांनाही वशिला व चमचेगिरीची वाळवी लागली आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा 1 ऑगस्ट रोजी पुण्यात संपन्न झाला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिला गेला. अमित शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने भिजले आहेत. दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर हजारो विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करत होते, तेव्हा अमित शहांच्या आदेशानेच या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा हल्ला करून हाहाकार माजवला. मुलांना जखमी केले. पोलिसांनी मुलींचा विनयभंग केला. त्या कृत्याबद्दल अमित शहा यांना अजिबात पश्चात्ताप झाला असे दिसत नाही. विरोधक त्यांचा राजीनामा मागत आहेत. अलीकडे शहा संसदेत जायला घाबरत आहेत. रात्रीच्या अंधारात ते पुण्यात पोहोचले. हे महाशय पुण्यात येण्याआधीच पोलिसांनी शेकडो लोकांची धरपकड केली. अशा डरपोक गृहमंत्र्याकडून ‘पुरस्कार समिती’ने टिळक पुरस्कार प्रदान करावा हे धक्कादायक आहे. लोकमान्य हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील खरे मर्द व पुरुषार्थ गाजवणारे जहाल नेते होते. ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच’ असे ब्रिटिशांच्या तोंडावर ठणकावून सांगणारे ते पुरुष सिंह होते. ते तुरुंगात गेले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला विचारले तेव्हा कंपनी सरकारला घाम फुटला होता. आता अमित शहांचीसुद्धा एक ईस्ट इंडिया कंपनी आहे व त्यांनी देशाला पारतंत्र्यात ढकलले आहे. स्वातंत्र्याचा उच्चार करणाऱ्यांविरुद्ध ईडी, सीबीआयच्या यंत्रणा लावून ते अटक करतात. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने दीडशे वर्षे
भारताची लूट
केली त्यापेक्षा जास्त लूट मोदी-शहांची ईस्ट इंडिया कंपनी करत आहे. देशातील सर्व गुंड, भ्रष्टाचारी लोकांना या कंपनीत सरकारने आश्रय दिला आहे. अशा कंपनीचे संचालक अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करणे हा राष्ट्रीय अपराध आहे. टिळकांचे सध्याचे वंशज नक्की कोण? हाच प्रश्न यामुळे पडला आहे. वारसा विचारांचा असतो, आडनावाचा नसतो. सध्याचे ज्यु. टिळक हे गद्दारांच्या मिंधे गटात सामील झाले, त्यातच या पुरस्कारामागचे षड्यंत्र उघड झाले. मिंधे गटाचे मालक अमित शहा आहेत. त्यामुळे या वर्षीचा टिळक पुरस्कार हा चमचेगिरी व लाचारीत वाहून गेला. बरं, पुरस्कार कोणाला द्यावा, तर सगळ्यात अपयशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल साहेबांना! त्यांच्या कर्तृत्वाच्या दंतकथाच जास्त. बाल नरेंद्राने लहानपणी नदीत शिरून मगरीशी कुस्ती केली, अशा कथांप्रमाणे अनेक कहाण्या डोवाल साहेबांच्या जीवन चरित्रास चिकटल्या आहेत. अंधभक्तांना त्या खऱ्या वाटतात. काहींनी त्या दंतकथांवर सिनेमा बनवले. पुरस्कार प्रदान करताना अमित शहा म्हणतात, ‘‘भारताचे परराष्ट्र धोरण कणखर, मजबूत, स्वाभिमानी करण्यात डोवाल यांचे योगदान मोठे आहे.’’ शहा-डोवाल एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत असताना कश्मीरात दहशतवादी हल्ला झाला व त्यात दोन लोक मरण पावले. श्री. डोवाल यांनी यावेळी सांगितले की, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. देशासमोर आजही मोठी आव्हाने आहेत. तरुणांनी राष्ट्र घडवायच्या कामात सहभागी व्हायला हवे, पण स्वतः डोवाल यांचा मुलगा ब्रिटिश नागरिक आहे हे पुरस्कार समितीला माहीत असायला हवे. डोवाल यांचे म्हणणे खरे आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे अनिर्बंध हुकूमशाहीदेखील नाही. ज्या हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली भारतीय जनता आज भरडली जात आहे. काही हजार अंधभक्त म्हणजे भारतीय जनतेचा आविष्कार नाही. पुण्यात टिळकांची पगडी डोक्यावर ठेवून त्यांच्या नावाचा
पुरस्कार घेताना
डोवाल यांनीही ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा प्रश्न अमित शहांसमोर विचारायला हवा होता. डोवाल यांनी हे केले नाही. उलट मोदी-शहांनी निर्माण केलेल्या हुकूमशाही ईस्ट इंडिया कंपनीचे ते एक संचालक बनले. त्यांनी विरोधकांवर पाळत ठेवण्यास, पक्ष फोडण्यास योगदान दिले. डोवाल यांच्याच काळात पठाणकोट, उरी, पुलवामा, पहलगाम घडले. डोवाल यांच्याच काळात मसूद अजहरची सुटका झाली. पुलवामातील हल्ल्यात 40 जवान नाहक मेले, पण या हल्ल्यात वापरलेले 300 किलो आरडीएक्स कोठून आले हे या जेम्स बाँड साहेबांना शोधता आले नाही. अमेरिकेच्या दबावाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ मोदी सरकारने अर्धवट सोडले. चीनने गलवान व्हॅलीत घुसून 20 भारतीय जवानांना मारले तरीही डोवाल यांचे भारतीय सुरक्षा व परराष्ट्र धोरण मजबूत करण्यात योगदान आहे, असे टिळक पुरस्कार समितीस वाटत असेल तर तो एक मानसिक घोटाळा आहे. सध्याचे टिळक मिंधे गटात आहेत. मिंधे महाशयांच्या सांगण्यावरून हा पुरस्कार डोवाल यांना दिला व पुरस्कार प्रदान करण्यासाठी मिंध्यांनी त्यांच्या मालकांना बोलावले. त्या बदल्यात सध्याच्या टिळकांना काय इनाम मिळते तेच पाहायचे. इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, वर्गीस कुरियन, प्रणव मुखर्जी, शीला दीक्षित, एस. एम. जोशी, गोदावरी परुळेकर, श्रीपाद अमृत डांगे, अब्दुल गफार खान, अच्युतराव पटवर्धन, अटलबिहारी वाजपेयी, मधू लिमये, प्रकाश विकास आमटे, सॅम पित्रोदा अशा महान विभूतींना याआधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यामुळे टिळक पुरस्काराचे तेज वाढले. मात्र पुण्याचे तेज, प्रतिष्ठा कमी करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्या कृत्यात महान लोकमान्य टिळकांचे वंशज असावेत हे बरे नाही. दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मिंध्यांना महादजी शिंदे पुरस्कार देणे व डोवाल साहेबांना ‘टिळक’ पुरस्कार देणे हे महाराष्ट्रीय समाजाचे अधःपतन आहे.





























































