
न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता प्रतिवाद्याने टाळाटाळ केल्याची दखल हायकोर्टाने घेतली आहे. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने या प्रकरणी संबंधित प्रतिवाद्याला नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तसेच सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश कायम ठेवल्यानंतरही वादग्रस्त जागेचा ताबा प्रतिवाद्याने सोपवला नाही, म्हणून या प्रकरणी सुनील शाह यांनी हायकोर्टात अॅड. पियूष हुशिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी प्रतिवादी रवींद्र परमार यांना नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत उत्तर देण्याचे आदेश देत सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.























































