
न्यूयॉर्क शहराचे महापौर झोरान ममदानी यांनी अॅमेझॉन, वॉलमार्टसह अन्य 40 कंपन्यांना ई-बाईक्स आणि ई-स्कूटर्सची विक्री थांबवण्याबाबत नोटीस बजावली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मामदानी यांनी म्हटले आहे. एका बेकायदेशीर ई-बाईक अपघातात 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे झोरान मामदानी यांनी ॲमेझॉन, वॉलमार्ट आणि इतरांना नोटीस बजावली.
अति-वेगवान आणि बेकायदेशीर ई-बाईक्स व ई-स्कूटर्समुळे अनेकांचे जीव गेले आहेत. यामुळेच न्यूयॉर्क शहरातील रहिवाशांना ही धोकादायक वाहने विकणाऱ्या 42 ऑनलाइन विक्रेत्यांविरुद्ध ‘सीज अँड डिसिस्ट’ आदेश जारी करत असल्याचे ममदानी यांनी स्पष्ट केले. यामध्ये टार्गेट, टेमू, वेफेअर, वॉलमार्ट आणि ॲमेझॉन यांचा समावेश आहे. न्यूयॉर्कवासीयांची सुरक्षा ही काही विकण्याची गोष्ट नाही. संबंधित वाहने वेग, वजन किंवा इतर सुरक्षा मानकांबाबतच्या कायदेशीर मर्यादांचे उल्लंघन करतात, असे ममदानी यांनी पुढे नमूद केले.
































































