
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात मी अजित पवार गटासोबत काम करावे असे वाटत असेल तर प्रदेश अध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्या, अशी सूचना प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना केली आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची गुरुवारी मुंबईत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक झाली. यापूर्वी ते तीन वेळा त्यांच्यात बैठक झाली. तेव्हा प्रशांत किशोर यांनी पक्षसंघटनेत काही बदल सुचवले होते. या बदलांची अंमलबजावणी होत नसेल तर काम करणे कठीण आहे. भविष्यातील निवडणुकांत मी काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, अशी ठाम भूमिका किशोर यांनी मांडली.
मला रणनीतीकाराची गरज नाही – तटकरे
आम्ही प्रॅक्टिकल आहोत. पवार साहेब, अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत मी काम केलं आहे. मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधीही केला नाही. मला काय असल्या रणनीतीकाराची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा आहे. महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय, असे सुनील तटकरे म्हणाले. ते रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही याची मला माहिती नाही, असं तटकरे म्हणाले.


























































