
बेस्टच्या ताफ्यातील खासगी कंपन्यांच्या बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी मातेश्वरी कंपनीच्या बसच्या धडकेत पालिकेच्या सफाई कामगार जयश्रीr परमार (वय 56) या महिलेचा मृत्यू झाला. मुलुंड चेकनाक्याजवळ रस्ता ओलांडत असताना परमार यांना बसची जोरदार धडक बसली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बेस्ट दिनीच हा अपघात घडला. कंत्राटी बसच्या वाढत्या अपघातांमुळे पादचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेस्टची ‘सी -512’ ही कंत्राटी बस मुलुंड चेकनाक्याच्या सिग्नलवर उभी होती. या बसवर चालक रवी भोईसे आणि वाहक शैलेश वाघ हे दोघेही मातेश्वरी कंपनीचे कंत्राटी कामगार होते. ग्रीन सिग्नल मिळताच चालकाने बस सुरू केली आणि रस्ता ओलांडणाऱ्या जयश्री यांना बसने जोरदार धडक दिली. बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. जयश्री यांना अग्रवाल रुग्णालयात नेले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. चालक आणि वाहकाला मुलुंड पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पोलिसांनी बस ताब्यात घेतली. मागील पाच महिन्यांत कंत्राटी बसचे तब्बल 21 अपघातांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.


























































