
राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राजनैतिक चर्चा आणि संवादाप्रती आपली पूर्ण बांधिलकी असली तरी, इराण कोणत्याही दबावाखाली येऊन शरणागती पत्करणार नाही, अशी भूमिका इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्पष्ट केली आहे. शुक्रवारी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी युद्ध संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत चर्चा करण्याच्या आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या कराराबाबत इराणची भूमिका मांडताना पेझेश्कियन म्हणाले की, अमेरिकेने करारांतर्गत आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन केल्यास इराणही आपल्या वचनांना पूर्णपणे जागणार आहे. मात्र, “जिथे ते (अमेरिका) आपली बांधिलकी पूर्ण करण्यात अपयशी ठरतील, तिथे आम्हालाही तो करार पाळण्याचे कोणतेही बंधन नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
या आठवड्याच्या सुरुवातीला पेझेश्कियन यांच्या राजीनाम्याबाबत काही अफवा पसरल्या होत्या. अमेरिकेसोबतच्या सामंजस्य करारामुळे इराणच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दुफळी माजल्याच्या बातम्या आल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. मात्र आपण राजीनामा देणार नसून अतिशय निश्चयाने आपले काम पुढेही सुरू ठेवणार असल्याचे जाहीर करत त्यांनी या राजकीय अफवांचे खंडन केले.




























































