तेलवाहू जहाजावरील हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचे उघड उल्लंघन, इराणवर युएईने व्यक्त केला संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या अॅडनॉक (ADNOC) कंपनीच्या तेलवाहू जहाजावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा संयुक्त अरब अमिरातीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे या हल्ल्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या २८१७ व्या ठरावाचे उघड उल्लंघन म्हटले आहे. हा ठराव आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात संचार स्वातंत्र्य अबाधित ठेवतो आणि व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्यास कडाडून विरोध करतो. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा दबावतंत्र किंवा आर्थिक ब्लॅकमेलिंगसाठी वापर करणे, ही इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डची उघड उघड दादागिरी आहे. यामुळे प्रादेशिक स्थैर्य, नागरिक आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीच्या जहाजावर क्षेपणास्त्राने हा हल्ला करण्यात आला. ॲडनॉकने या हल्ल्याला दुजोरा दिला असून, परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आल्याचे आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांपैकी कुणाचीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ॲडनॉक ही जगातील प्रमुख ऊर्जा उत्पादक कंपन्यांपैकी एक असून ती जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करते.