
पती-पत्नीच्या नात्यात तिसऱ्याची एन्ट्री होऊन मागील काही वर्षांमध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेकांचे जीव गेले आहेत. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता तेलंगणातील खम्मन जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. मात्र, या घटनेत पतीचा मृत्यू झाला नसून त्याने पत्नीविरोधात जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे.
चिल्कोडू येथील जी. राजेश्वर राव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी भवानी हिचे साईदूलू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. पत्नीच्या बदललेल्या वर्तनामुळे राजेश्वर यांना शंका आली आणि जेव्हा त्यांनी पत्नीचे मोबाईल चॅट्स तपासले, तेव्हा त्याला खळबळजनक माहिती मिळाली. भवानीने प्रियकरासोबत मिळून आपली हत्या करण्याचा कट रचल्याचे आणि हा मृत्यू एक रस्ते अपघात म्हणून भासविण्याचे संदेश या चॅटमध्ये असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. TOI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वर राव यांनी आपल्या तक्रारीसोबत पत्नी व तिच्या प्रियकरामधील संभाषणाचे स्क्रीनशॉट्स आणि इतर पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. “पतीला घरात मारल्यास संशय येईल, त्याऐवजी त्याचा काटा अपघातासारखा काढा,” अशा आशयाचे मेसेज या दोघांमध्ये झाल्याचा दावा पतीने केला आहे. तसेच, ‘तू नाही मारलेस तर मीच त्याची हत्या करेन,’ असेही मेसेजमध्ये नमूद असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खम्मम ग्रामीण पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून तपास सुरू केला असून, सादर केलेल्या डिजिटल पुराव्यांची सत्यता पडताळली जात आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही आरोपी (पत्नी भवानी आणि तिचा कथित प्रियकर साईदूलू) फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राजेश्वर राव यांनी आपल्या आणि आपल्या दोन मुलींच्या जीवाला धोका असल्याचे सांगून सुरक्षेची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाच्या सर्व बाजूंचा सखोल तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

























































