बीड, माजलगाव, वडवणीत अन्न व भेसळवाल्यांचे छापे; तीन मील सील, दोन कोटी रूपयांचे खाद्यतेल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील भेसळखोरांविरुद्ध एफडीएची धडक मोहीम सुरू आहे. याच दरम्यान, बीड जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई केली. त्यांनी बीड, वडवणी आणि माजलगाव येथील ऑईल मिलवर छापे टाकले. तेथून भेसळयुक्त तेलाचे नमुने जप्त करून सील केले आहेत. या तिन्ही ठिकाणांवरून जवळपास दोन कोटी रुपयांचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या धडक कारवाईच्या भीतीने बीड आणि अन्य शहरांतील मोंढा भागातील जवळपास ८० टक्के दुकाने बंद होती.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. हे धाडसत्र यापुढेही असेच सुरू राहणार आहे. निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही तेल खरेदी करताना काळजी घ्यावी. त्यांनी पॅकेटवरील लेबल, एफएसएसएआय (FSSAI) क्रमांक आणि उत्पादनाची तारीख तपासूनच खाद्यतेल खरेदी करावे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात दोन दिवसांत तेल रिपॅकिंग उद्योगांवर छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांनी बीड शहरातील एमआयडीसी भागातील झंवर यांच्या स्वागत ऑईल इंडस्ट्रीजवर छापा टाकला. तेव्हा तिथे ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले. एकाच टाकीतील तेल ‘रिफाइंड’ आणि ‘अल्ट्रा रिफाइंड’ म्हणून पॅक केले जात होते. मिलचा परिसर अत्यंत अस्वच्छ होता. तसेच, तेल साठवण्याच्या टाक्याही अस्वच्छ आढळून आल्या. तिथे एकही तांत्रिक अधिकारी उपस्थित नव्हता. ऑईल मिलकडे ‘फूड ग्रेड’ प्रमाणपत्रेही नव्हती. इतकेच नाही, तर तिथे काम करणाऱ्या कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. तसेच, ‘पेस्ट कंट्रोल’चे रेकॉर्डही आढळले नाही.

यावेळी अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे संशयित खाद्यतेल जप्त केले. त्याची किंमत १ कोटी ५ लाख ८५ हजार २३६ रुपये असून ते ६६ हजार ६५२ किलो आहे. यात रिफाइंड सोयाबीन, पामतेल, स्वागत गोल्ड, गुडलूक आणि स्वस्तिक ब्रँडच्या पॅक तेलाचा समावेश आहे. तिथून तपासणीसाठी १० नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. या आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच, ही ऑईल मिल सील करण्यात आली आहे.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी बीड एमआयडीसीतीलच चरखा ऑईल मिलवर छापा टाकला. तिथेही लेबलिंगमध्ये फसवणूक आणि अस्वच्छता आढळून आली. तसेच, लॅब आणि रेकॉर्डचाही अभाव होता. तिथून अधिकाऱ्यांनी ७८ लाख २२ हजार ५० रुपये किमतीचे ४५ हजार ९९५ किलो खाद्यतेल जप्त केले. यात रिफाइंड, सोयाबीन, पामोलीन, राईस ब्रान आणि शुभम, अनुज ड्रॉप, शुभम अल्ट्रा ब्रँडचा समावेश आहे. त्या ठिकाणाहून ११ तेलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या चरखा ऑईल मिलचा परवाना रद्द करून ती सील करण्यात आली आहे.

बीडमधील कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वडवणी तालुक्याकडे वळवला. वडवणीत जय हनुमान ट्रेडर्सवर छापा टाकण्यात आला. तिथे सर्वत्र अस्वच्छता होती. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ‘पेस्ट कंट्रोल’ रेकॉर्डचा अभाव आढळला. या कारवाईत ७ लाख २६ हजार ५९६ रुपयांचे ४ हजार ५४५ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. यात सोहम ब्रँड, पामोलीन आणि खुल्या सोयाबीन तेलाचा समावेश आहे. तेथून तेलाचे तीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. परवाना निलंबित करून ही आस्थापना सील करण्यात आली आहे.

बीड आणि वडवणीनंतर माजलगावच्या जुना मोंढा भागातील जान्हवी कमर्शियल्सवर छापा टाकण्यात आला. तिथे बॅच नंबर आणि लेबल नसलेले सुट्टे तेल असुरक्षितरीत्या साठवल्याचे आढळले. या कारवाईत २ लाख ७९ हजार ३६० रुपयांचे १ हजार ७४६ किलो तेल जप्त करण्यात आले. तपासणीसाठी दोन नमुने घेण्यात आले आहेत. या मिलचा परवाना रद्द करून आस्थापना सील करण्यात आली आहे. याचबरोबर, माजलगावच्या जुना मोंढा येथील विनायक ऑईल इंडस्ट्रीजमध्येही छापा टाकण्यात आला. तिथे अस्वच्छता आणि रेकॉर्डचा अभाव आढळला. त्यामुळे ३९ हजार ६८० रुपयांचे २४८ किलो सुट्टे खाद्यतेल जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण पाच ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपयांचे तब्बल १ लाख १९ हजार १८७ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी घोपे, मुळे, अजय गाढे, ठोंबरे, खंदारे, खाडे, गणेश दत्तू, रोहित फांदी, अंकुश नरवडे, सिद्धांत खंडारे आणि बोथरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

दरम्यान, बीड शहर आणि जिल्ह्यातील इतर ऑईल इंडस्ट्रीजमध्येही गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. तिथे सुट्टे खाद्यतेल पॅक करून चढ्या दराने विकले जात असल्याचे बोलले जाते. अशा उद्योगांवरही अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.