दोन चिमुकल्यांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू, कोराडी प्रकल्प क्षेत्रातील हृदयद्रावक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावापासून जवळच असलेल्या कोराडी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यालगत पाणी पुरवठा विहिरीजवळील खदाणीत उतरून पाय धूत असताना दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना आज, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने देऊळगाव माळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयान राजू शेख (वय अंदाजे १० वर्षे, रा. देऊळगाव माळी) आणि त्याचा मावस भाऊ आवेद इब्राहिम शेख (वय अंदाजे ११ वर्षे, रा. लोणार) हे दोघे शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी धरणावर आले होते.

धरणाच्या पाण्यालगत पाणी पुरवठ्यासाठी अंदाजे १५ × ४५ आकाराची खदाण खोदलेली असून, त्यात धरणाचे पाणी साचलेले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाणी जमिनीच्या बरोबरीने दिसत असल्याने मुले तेथे पाय धुण्यासाठी गेली. मात्र, सदर खदाण खोल असून त्याला आतून कपार (काठ) असल्याने दोन्ही मुले अचानक पाण्यात बुडू लागली.

यावेळी शेख आसिफ शेख हुसेन यांनी मुलांना वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत असलेल्या मुलीला वाचविण्यात यश आले; मात्र आयान आणि आवेद ही दोन्ही मुले पाण्यात बुडाली.

घटनेची माहिती मिळताच गावातील पुरुषांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी अत्यंत खोल असल्याने त्यांना यश आले नाही.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस स्टाफ, मंडळ अधिकारी तसेच स्थानिक गावकरी उपस्थित असून मदत व बचावकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती NDRF च्या विशेष पथकाला देण्यात आली आहे. मात्र, रात्र झाल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने NDRF पथक उद्या सकाळी घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू करणार असल्याचे पथक प्रमुखांनी कळवले आहे.

दोन चिमुकल्यांच्या या दुर्दैवी घटनेमुळे देऊळगाव माळी परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.