
हिंदुस्थानचे दिग्गज क्रिकेटपटू स्वर्गीय दिलीप सरदेसाई यांच्या जयंतीनिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने आज वानखेडे स्टेडियमवर ‘दिलीप सरदेसाई गेट’ दर्शवणारा स्मृतिफलक बसवला. दिलीप सरदेसाई हे मुंबईचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि हिंदुस्थानचे नामांकित फलंदाज होते. 1971 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील दिलीप सरदेसाई यांचे योगदान अफाट आहे. ते एक महान क्रिकेटपटू होते आणि भारताच्या क्रिकेट प्रवासातील एक महत्त्वाचा भाग होते. त्यांच्या जयंतीनिमित्त, वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या स्मृतीचा आणि वारशाचा सन्मान करणे ही अत्यंत योग्य गोष्ट आहे. त्यांचे नाव असलेला हा फलक क्रिकेटपटूंच्या आणि क्रिकेटप्रेमींच्या अनेक पिढय़ांना त्यांनी या खेळासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत राहील, असे याप्रसंगी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.






























































