
दिल्लीतील जंतरमंतर येथील जेन झींच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेले अत्याचारावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात यावे आणि या प्रकरणावर निवेदन करत या घटानांना जबाबदार कोण याविषयी माहिती द्यावी अशी मागणी विरोधक करत आहेत. अमित शहा सभागृहात येऊन निवेदन देण्यास तयार आहेत मात्र त्यासाठी विरोधकांनी गोंधळ घालू नये अशी अट घालण्यात आली आहे. या सर्वप्रकरणावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना लक्ष्य केले आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मी आतापर्यंत सुनावणीबाबत पूर्ण समाधानी आहे. न्यायालय ज्या आत्मीयतेने आणि गांभीर्यतेने आमचा युक्तिवाद ऐकून घेतला. न्यायालयाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणतीही फेव्हर्स नकोय. आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवाय एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
2018 मध्ये निवडणूक आयोगाने जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अलोकशाही असेल असं तेव्हा निवडणूक आयोगाला वाटलं असेल मग तो अलोकशाही पक्ष शिंदेंना कसा दिला. तेव्हा त्या अलोकशाही पक्षाची मान्यता रद्द करायला हवी होती. निवडणूक आयोग ज्या पक्षाला अलोकशाही म्हणतो तसाच्या तसा पक्ष, पक्षाशी संबंध नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या हातात निवडणूक आयोगाला देत असेल याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव होता किंवा निवडणूक आयोग विकला गेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पक्षाचं चिन्ह गोठवण्याबाबत न्यायालय निर्णय घेईल. चुकीच्या माणसांच्या हातात बाळासाहेबांचं चिन्ह गेल असेल तर आमची पहिली मागणी आहे की हे चिन्ह त्यांच्या हातातून काढून घ्या. एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे आहेत. त्यांचा फार अभ्यास नाहिये. त्यामुळे अशी व्यक्ती सत्तेत असणे हे चिंतेची गोष्ट आहे. चोर तर चोर वर शिरजोर अशी मराठीत म्हण आहे. चोरांच्या हातात तुम्ही पवित्र धनुष्यबाण दिला तो आधी ते चोराकडून काढून घ्या अशी आमची भूमिका आहे. या चोरीत भारतीय निवडणूक आयोग सामील झालेला आहे. पक्ष आणि चिन्हाची जी चोरी झाली आहे त्यात भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे, आणि संगनमताने ही चोरी झाली. आधी मुद्देमाल जप्त करा.
जोवर अमित शहा यांच्या मनातील विरोधी पक्षाबाबतचं भय नष्ट होत नाही, तोवर ते संसदेत येणार नाहीत आणि संसदेचे कामकाज चालणार नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी इतके घाबरलेले आहेत की त्यांना संसदेत येण्याचे धाडसच होत नाही. 15 -16 दिवस होऊन सरकारमधले दोन प्रमुख नेते संसदेत यायला तयार नाहीत, आणि त्यांच्या वतीने कुणीतरी मंत्री तडजोडीचे मसुदे घेऊन येत आहेत हे चालणार नाही.
भाजपने 360 खासदारांची यादी तयार केली आहे. त्यात शिवसेनेचे फुटलेल्या तीन खासदारांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या 8 खासदारांचीही नावे या यादीत आहेत. पण या 8 खासदारांपैकी एकही खासदार भाजपच्या पंक्तीला बसणार नाही. पक्ष काय त्यांच्या माता पित्यांचा आहे का? शरद पवार यांच्या पक्षाकडून जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार ते अशी कोणतीही समाजविरोधी भूमिका घेणार नाहीत.
अमित शहांनी तर राजीनामा द्यायला पाहिजे, भविष्यात ही वेळ येईल. राम मंदिर घोटाळा प्रकरण आणि जंतरमंतरवर तरुणांवर पेलेट गनने झालेल्या हल्ल्याचे आदेश कोणी दिले? या दोन मुद्द्यांवरच संसदेत गोंधळ सुरू आहे. या दोन्ही विषयांवर चर्चा होणार. अमित शहा स्वतःला लोहपुरुष सरदार पटेल समजतात, मग त्यांनी घाबरू नये. आम्हाला तुरुगांत टाकलं, आमच्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरू होती, तरी आम्ही तुम्हाला घाबरलो नाही. आम्ही तुम्हाला घाबरणारच नाही. आता घाबरण्याची वेळ तुमची आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.




























































