
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील श्रद्धा सबुरी लॉजवर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
पाली येथील श्रद्धा सबुरी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि महिला कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी बोगस ग्राहक पाठवून श्रद्धा सबुरी लॉजवर छापा टाकला. छापेमारीत मूळची नेपाळची असलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही महिला दुसऱ्या पीडित महिलेच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांकडून घेतलेले दोन हजार रुपये महिलेच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी निरोधाची पाच पाकिटे, दोन हजार रोख रक्कम,पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, ग्रामीणचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, छाया चौधरी, संदीप ओगले, विजय आंबेकर, गणेश सावंत, स्वाती राणे, अतुल कांबळे यांनी केली.





























































