दोन दिवसांपूर्वी भाड्याने राहायला आलेल्या शेख कुटुंबावर काळाचा घाला, ‘वर्क फ्रॉम होम’ दोघा तरुणांच्या जिवावर बेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ल्याच्या चिराग नगरात बुधवारी पहाटे भयंकर दुर्घटना घडली. दाटीवाटीची वस्ती असलेल्या गौसिया चाळीत भूस्खलनामुळे घरं पडून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर तिघे जखमी झाले. मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश असून ते दोन दिवसांपूर्वीच त्या घरात भाड्याने राहायला आले होते. तर घरातून काम करणारा विकित ऊर्फ राहुल यादव आणि त्याचा मित्र सदाम यांनादेखील मृत्यूने कवटाळले.

चिरागनगरात दाटीवाटीची वस्ती आहे. तेथील गौसिया चाळीत अगदी डोंगराला लागून बरीच घरं आहेत. गंभीर म्हणजे तळ अधिक एक मजला अशी घरं तिथे उभारली असून अक्षरशः रामभरोसे तेथे लोकं राहत आहेत. अखेर बुधवारी पहाटे तीन वाजता नको ती घटना घडलीच. भूस्खलनामुळे तीन घरं कोसळली. परिणामी झोपेत असलेले लहान मुलं, त्यांचे पालक तसेच तरुणांवर काळाने घाला घातला. मातीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जण गाडले गेले. दोन दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या घरात भाड्याने राहावयास आलेल्या शेख कुटुंबातील चौघांचा यात अंत झाला. तर बाजूच्या घरात मित्रांसोबत काम करत बसलेल्या विकित ऊर्फ राहुल यालाही जिवास मुकावे लागले.

बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले रात्री जेवण करून परिसरातील नागरिक नेहमीप्रमाणे झोपी गेले होते. परिसरात शांतता होती. अचानक रात्री ३ वाजण्याच्या सुमारास परिसर हादरला. बॉम्बस्फोट झाला की काय असेच क्षणासाठी वाटले. पण स्वतःला सावरत आम्ही घराबाहेर येऊन पाहिल्यावर भूस्खलन होऊन तीन घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याचे दिसले. एक व्यक्ती जाईल एवढीच पायवाट असल्याने काय करावे आणि काय नको तेच सुचत नव्हते. परिणामी मदतकार्य करण्यास विलंब होत गेला. अखेर या दुर्घटनेत आठ जण दगावल्याचे समजल्याचे परिसरातील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच मृत्यूने कवटाळले
दुर्घटनाग्रस्त एका घरात विकित ऊर्फ राहुल यादव आणि त्याचा मित्र सद्दाम हे दोघे काम करत होते. पावसाळा आला की राहुलचे कुटुंबीय अन्य खोली भाड्याने घेऊन तेथे राहण्यास जातात. त्याप्रमाणे यावेळीदेखील मूळ घरापासून काही अंतरावर राहुलच्या कुटुंबाने घर घेतले होते. पण त्या घरात वायफाय सुविधा नसल्याने राहुल आणि त्याचा मित्र सद्दाम दुर्घटनाग्रस्त घरात बसून काम करायचे. मंगळवारी रात्रीदेखील ते काम करत असताना ही दुर्घटना घडली. राहुलचा १३ तारखेला वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मृत्यूने त्याला कवटाळले असे परिसरातील त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले.

…पण मोठा दगड रोखला गेला
डोंगरावर असलेल्या दुर्घटनाग्रस्त घराला लागून पिंपळाचे झाड होते. तेच भलेमोठे झाड उन्मळून पडले. पण सुदैवाने एक मोठा दगड त्या झाडामुळे अडवला गेला. तो दगड अन्य घरांवर कोसळला असता तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती.

शोध कार्य सुरू
राहुल यांच्याबरोबरच त्यांचा मित्र सद्दाम हादेखील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला गेला. राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत सद्दामचा शोध लागला नसता. मातीचा ढिगारा उपसून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.